तब्बल ९ हजार कोटींचे फसवणूक प्रकरणात ईडीचे छापे

0
81

पुणे शहरात अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक पोहचले आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या डी. एस. कुलकर्णी म्हणजेच डीएसके यांच्या मुख्य कार्यालयावर छापे मारले आहे. जंगली महाराज रोडवरील कार्यालयावर ईडीने छापे मारले आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ईडीची दोन पथक डीएसकेच्या कार्यालयात पोहोचले असून कसून चौकशी सुरु केली आहे.

पुणे येथील बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर ९ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीची ही रक्कम ८०० कोटींची आहे. या फसवणूक प्रकरणात डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावई यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटक झाली होती.

फसवणूक प्रकरणात डीएसके यांचा बंगला ईडीने जप्त केला आहे. त्यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. डीएसके यांचा पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर बंगला आहे. सप्तश्रृंगी नावाच्या या बंगल्यातील कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळण्यासाठी डीएसके यांनी नुकतेच कोर्टात अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा हा अर्ज मंजूर केला होता.

अंमलबजावणी संचालनालयाने आणि डीएसके यांनी या प्रकरणाचे संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करावे, तसेच बंगल्यातील कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करण्यात यावे, असे आदेश कोर्टाने दिले होते. डीएसके यांनी बंगल्यातील आणि कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा ते सील करण्यात आले. या प्रकरणास दोन दिवस होत नाही, तोच ईडीच्या पथकाने पुन्हा छापे मारले आहे.

डीएसके पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. पुणे शहरात अनेक त्यांचे प्रकल्प आहेत. परंतु गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरणानंतर ते अडचणीत आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.