तब्बल १४ कोटींची रोकड , ८ किलो सोन्यासह १७० कोटींचे घबाड

0
69
  • राजकीय नेत्यांचा बेनामी पैसा असल्याचा आयकर विभागाला संशय

नांदेड शहरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. शहारातील भंडारी फायनान्स आणि आदिनाथ सहकारी बँकेवर आयटी पथकाने छापा टाकला. या छाप्यात कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता सापडली असून, ती प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. आयकर विभागाची ही कारवाई तब्बल 72 तास सुरू होती.कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड सापडली, ज्याची मोजणी करण्यासाठी 1-2 नव्हे तब्बल 14 तास लागले. या छाप्यात विभागाला भंडारी कुटुंबाची 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. एवढंच नव्हे तर 8 किलो सोनंही सापडलं. आयकर विभागाने आयकर विभागाने 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता शोधून काढली असून ती जप्त करण्यात आली आहे. छापेमारीत सापडलेली 14 कोटींची रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 14 तास लागले. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे फायनान्स व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली.

भंडारी कुटुंबातील विनय भंडारी, संजय भंडारी, आशिष भंडारी, संतोष भंडारी, महावीर भंडारी आणि पदम भंडारी यांचा नांदेडमध्ये खासगी फायनान्सचा मोठा व्यवसाय आहे. मात्र येथे करचुकवेगिरी झाल्याची तक्रार आयकर विभागाकडे आली होती. त्यामुळे पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या सहा जिल्ह्यांतील प्राप्तिकर विभागाच्या शेकडो अधिकाऱ्यांनी संयुक्त छापेमारी केली. शुक्रवार, 10 मे रोजी नांदेड येथील भंडारी फायनान्स आणि आदिनाथ सहकारी बँकेवर पथकाने छापा टाकला.

सुमारे 100 अधिकाऱ्यांचे पथक 25 वाहनांतून नांदेडला पोहोचले होते. या पथकाने अलीभाई टॉवर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कार्यालय, कोठारी कॉम्प्लेक्समधील कार्यालय, कोकाटे कॉम्प्लेक्समधील तीन कार्यालये आणि आदिनाथ अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेवर छापे टाकले. याशिवाय पारसनगर, महावीर सोसायटी, फरांदे नगर, काबरा नगर येथील घरांवरही छापे टाकण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात प्रथमच आयकर विभागाने अशी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस कारवाई सुरू ठेवली. यावेळी सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. 72 तास चाललेल्या या कारवाईत आयकर विभागाने 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. त्यामध्ये विभागातील अधिकाऱ्यांना 8 किलो सोनं आणि 14 कोटी रुपये रोख सापडले. सध्या आयकर पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहे.