तब्बल आठ कोटींचे रक्तचंदन जप्त

0
28

दि ७ जुलै (पीसीबी ) पुणे, : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे कार्यालयातील पथकाने नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या बंदरात (न्हावा शेवा) कारवाई करून आठ टन रक्तचंदन जप्त केले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाची आंतराष्ट्रीय बाजारात सात कोटी ९० लाख रुपये एवढी किंमत आहे.

परदेशात मोठ्या प्रमाणावर रक्तचंदनाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनायाच्या पथकाला खबऱ्याकडून मिळाली होती. नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या बंदरातून परदेशात जहाजातून रक्तचंदन पाठविण्यात येणार होते. रक्तचंदन घेऊन बंदरात निघालेला कंटनेर पथकाने अडवला. कंटेनरची तपासणी करण्यात आली. तेव्हा सहा टन रक्तचंदन सापडले.

पथकाने निर्यातदार, दलाल, गोदाम व्यवस्थापक आणि वाहतूकदारासह पाच जणांना अटक केली. आरोपींची चौकशी करण्यात आली. चौकशी मिळालेल्या माहितीनुसार पथकाने नगर, नाशिक आणि हैदराबाद येथे कारवाई केली. नाशिक येथील एका गोदामाची छापा टाकण्यात आला. तेथून दोन टन रक्तचंदन जप्त करण्यात आले. न्हावा शेवा बंदरात जप्त करण्यात आलेले सहा टन रक्तचंदन परदेशात पाठविण्यात येणार होते. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालायीन कोठ़डीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.