तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

546

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाने कोणतीही परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 21) रात्री साडेआठ वाजता मिलिंदनगर, पिंपरी येथे करण्यात आली.

विकी उर्फ मळ्या महादेव गायकवाड (वय 28, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राजेंद्र बारशिंगे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकी गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 6 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत पिंपरी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी मिलिंदनगर येथे सापळा लाऊन विक्री गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.