डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून रिक्षा चालकाचा खून

0
259

दापोडी, दि. २० (पीसीबी) – रस्त्यावर उभ्या केलेल्या रिक्षात दोघेजण अश्लील चाळे करत असल्याने त्यांना रिक्षा चालकाने हटकले. यावरून झालेल्या वादात रिक्षा चालकाच्या डोक्यात सिमेंट गट्टू घालून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. १९) गणेशनगर, दापोडी येथे घडली.

अलीम इस्माईल शेख (वय ४२, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. अमित बाळासाहेब कांबळे (वय २६, रा. दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी असिफ इस्माईल शेख (वय ४६, रा. नानापेठ, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांची रिक्षा आहे. रविवारी सायंकाळी ही रिक्षा गणेशनगर येथे रस्त्यालगत उभी केली होती. या रिक्षात आरोपी अमित त्याच्या मैत्रिणीसोबत अश्लील चाळे करत बसला होता. शेख यांनी त्यांना हटकले. याचा राग आल्याने रिक्षात बसलेल्या आरोपीने शेख यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.