डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी बॅरिकेट्स..

30

पिंपरी,दि.१४ (पीसीबी) – देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशासाठी काय दिले. हे खूप महत्त्वाचे आहे ही शिकवण जनमानसात रुजवण्याचे कार्य डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी आयुष्यभर केले. त्यांचा समाजसेवेचा वारसा डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी पुढे नेत आहेत.

यंदाचे वर्ष महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून सर्वत्र विविध सामाजिक उपक्रम घेवून साजरे करण्यात येत आहे. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या वतीने बॅरिकेट्स देण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी वर्ष आणि डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण आणि आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी पिंपरी चिंचवड मधील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि. १४ मे २०२२) वाकड पोलिस स्टेशन येथे झालेल्या कार्यक्रमात हे बॅरिकेट्स पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलिस स्टेशन सत्यवान माने, पोलीस निरीक्षक गुन्हे १, वाकड पोलिस स्टेशन संतोष पाटील यांनी स्वीकारले. यावेळी पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग वाकड सुनील पिंजण, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे संतोष पाटील, पोलीस हवालदार दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिलेले बॅरिकेट्स वाहतूक नियंत्रण, व्हीआयपी बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने, नाकाबंदी इत्यादी कामासाठी अतिशय उपयुक्त ठरतील असे यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच प्रतिष्ठानतर्फे झालेल्या स्वच्छता अभियानाचे विशेष कौतुक केले. वृक्षलागवड आणि संवर्धन, विहीर स्वच्छता व जलपुनर्भरण योजना, जलाशयातील व तलावातील गाळ काढणे, पाण्याच्या टाक्या व पानपोई बांधणे, बंधारा बांधणे, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, औषध वितरण कृत्रिम अवयव बसवणे, श्रवण यंत्र वाटप, स्वच्छता अभियान व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, आपत्ती व्यवस्थापन, चित्र प्रदर्शनाद्वारे जनजागृती, बसथांबे व वाहन चालक प्रशिक्षण, रस्ता सुरक्षा जागृती, स्मशानभूमी स्वच्छता व देखभाल इत्यादी कामे प्रतिष्ठानच्या वतीने नियमितपणे केली जातात. त्याच बरोबर शाळांमध्ये आसन व्यवस्था बेंच वाटप, निर्माल्य व्यवस्थापन गड किल्ले स्वच्छता, शालेय पुस्तक, वह्या वाटप, उद्योजक विकास कार्यशाळा, ब्लड स्टेम सेल्स डोनेशन कॅम्प आदी समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.