डॉ. बाबा आढाव, कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित तर डॉ. पी. डी. पाटील यांना प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार

141

आपल्या विद्यापीठांना सावित्रीबाईंचे नाव आहे पण त्यांचा एकही विचार किंवा पाठ शिकवला जात नाही- बाबा आढाव

पुणे, दि. ९ (पीसीबी)- रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठान आयोजित ‘प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार’ आणि ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान समारंभ बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर येथे नुकताच पार पडला. पुरस्काराचे स्वरूप तुकारामांची गाथा ,तुकारामांची पगडी, मानपत्र, २५ हजाराचा धनादेश असे होते. या वेळी
कृतज्ञता पुरस्कारार्थी म्हणून डॉ. बाबा आढाव यांना गौरवण्यात आले तर डॉ. पी. डी. पाटील यांना
जीवन गौरव पुरस्काराने, छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

” आपण आजपर्यंतचा इतिहास पाहता शिवाजी महाराजांपर्यंतचा इतिहासच आपण जाणतो, पण त्यापुढे देखील बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. तो इतिहास देखील आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. शिक्षण, जात या सगळ्याचा एक इतिहास आहे. तात्पुरता विचार न करता दूरदृष्टीने विचार करावा. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मुळापर्यंत जाणे शिकवत नाहीत. आजची शिक्षण पद्धती आधुनिक आहे, पण बारीक बारीक गोष्टींचा विचार करणे ही गरजेचे आहे. भविष्याचा विषय सोडून चालणार नाही त्यामुळे भविष्यात त्रासदायक होईल अशा काही गोष्टी करू नये.

आपल्या विद्यापीठांना सावित्रीबाईंचे नाव आहे पण त्यांचा एकही विचार किंवा पाठ शिकवला जात नाही. मुलांचा भविष्य शासनाच्या या कारभारामुळे धोक्यात येत चालले आहे. शिक्षण उंचावले आहे पण मुलांचे भविष्य शासनाच्या या गलथान कारभारामुळे धोक्यात येताना दिसते. आजच्या विद्यापीठांना आपण काय मुलांना शिकवत आहोत हा विचार करण्याची गरज आहे. मला जे जाणवते तेच मी तुमच्यापुढे मांडत आहे”. असे यावेळी बोलताना बाबा आढाव म्हणाले.

यावेळी बोलताना डॉक्टर पी डी पाटील यांनी रामकृष्ण मोरे यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले, “शहरामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था झाल्या. खाजगी शिक्षण संस्थांमुळे लाखो विद्यार्थ्यांना लाभ झाला व त्याबरोबर मोठ्या प्रमाणात शिक्षक वर्ग ही कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना मला बरीच मोठी लोकं भेटली. त्यामध्ये एक म्हणजे रामकृष्ण मोरे, एक वेगळा असं व्यक्तीमहत्त्व. त्यांच्या मुलीने आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले त्यानिमित्ताने आमची मैत्री झाली व ती घट्ट होत गेली. रामकृष्ण मोरे यांना शिक्षणाचा मोठा ओढा होता. तसेच प्राध्यापक देखील तरबेज असावेत अशी त्यांची मनशा नेहमी असायची. त्यांचे वाचन देखील अफाट होते. ते एक उत्तम संसद पटू देखील होते”.

शाहू महाराज या वेळेस बोलताना म्हणाले, “फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आपण पुढच्या पिढीला देणे गरजेचे आहे. तसेच ते कृतीमध्येही उतरवणे गरजेचे आहे. आधुनिक शिक्षणांमध्ये त्यांच्या विचारांना स्थान देणे महत्वाचे. आजपर्यंत चळवळीत भाग घेतलेल्यांचा आदर्श घेऊन त्यांचे विचार पुढं न्हावेत. महाराजांचे जे विचार होते ते अजूनही काही प्रमाणात पूर्ण झालेले नाहीत ते आपण पूर्ण केले पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. शिक्षण संस्थांमध्ये अनेक मुले शिकत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप देखील त्यांना देणे गरजेचे आहे. बहुजनांच्या शिक्षणाकडे देखील आज आपण लक्ष दिले पाहिजे”.

यावेळी डॉ. श्री. छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर, रामदास फुटाणे, राजीव जगताप, सुनील महाजन, हरी चिकणे, उल्हास पवार, संजय बालगुडे, नाथाभाऊ कुदळे, सचिन इटकर, मंदार चिकणे उपस्थित होते.
सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंदार चिकणे यांनी केले