डॉ. कोल्हे यांच्या परभवासाठी नाना पाटेकर यांच्या नंतर आता दुसरे मोठे नाव चर्चेत

0
2380

पुणे, दि. २६ (पीसीबी) – महाआघाडीचे संभाव्य लोकसभा उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जंगजंग पछाडत आहेत. महायुतीमधून तगडे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे भोसरीचे दमदार आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते अशा सर्वांच्या नावावर चर्चा झाली पण यापौकी कोणालाही उमेदवारी मिळणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांत प्रथम प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर यांच्या नावावर चर्चा खोळंबली होती मात्र, आता पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंद हे पूर्वाश्रमिचे राष्ट्रवादीचेच, पण आमदारकासाठी संधी मिळाली नाही म्हणून ते भाजपमध्ये गेले होते. आता पुन्हा ते स्वगृही परतणार असून अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश कऱतील किंवा बारामती लोकसभेची पारंपरीक भाजपच्या वाट्याची जागा राष्ट्रवादीला आणि शिरूर लोकसभेची राष्ट्रवादीची जागा भाजपला अशी आदलाबदल होण्याची शक्यता आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा डाव टाकला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे तसे अजित पवार यांचे कट्टर समर्थक. एकेकाळचे निष्ठावंत आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या मैत्रीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनाच शिरूरच्या मैदानात उतरविण्याचा चंग अजितदादांनी बांधला आहे. त्यासाठी कंद हे लवकरच घरवापसी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठी उमेदवारही तेवढाच तुल्यबळ असावा, यासाठी चाचपणी सुरू आहे. त्या दृष्टीने अजित पवार गटाकडून मोठी घडामोड घडत असल्याचे पुढे येत आहे. एकेकाळचे अजितदादांचे निष्ठावंत सध्या भारतीय जनता पक्षात असलेले यांना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी खुद्द अजित पवार यांनी विचारणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कंद यांच्याशी अजित पवार यांची चर्चा झाली आहे.

भाजपचे प्रदीप कंद येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजितदादांनी प्रदीप कंद यांना लोकसभा लढविण्याबाबत विचारणा केली आहे. प्रदीप कंद यांचा अजित पवार गटात प्रवेश आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा आहे. त्यांच्याकडून होकार आल्यानंतर कंद यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि लोकसभा उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव, जुन्नर, खेड, भोसरी, शिरूर-हवेली आणि हडपसर हे मतदारसंघ येतात. यातील पाच मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत. त्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. जुन्नरचे आमदार अतुल बेनके, खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी कंद यांच्या नावावर सहमती दर्शविली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून प्रदीप कंद यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे.

दरम्यान, प्रदीप कंद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुशीत वाढलेले नेते आहेत. ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांना राष्ट्रवादीने पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्ष बनवले होते. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांना शिरूरमधून उमेदवारीची अपेक्षा हाेती. मात्र, त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यानंतर कंद यांनी 2019 च्या निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यामुळे कंद हे अजूनही अजितदादांचे समर्थक म्हणूनच ओळखले जातात.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिशन ४०० चे लक्ष ठेवले आहे. या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशामध्ये भाजपाची सुकर वाटचाल असताना महाराष्ट्रामध्ये गेली वर्षभरामध्ये झालेल्या राजकीय घडामोडीवरून ही विजयाची गणितमोड संघर्षपूर्ण असणार आहे असे भाजपाला वाटते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये पक्ष न पाहता निवडून येईल त्या उमेदवाराला संधी द्यायची असे महायुतीमध्ये ठरले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे ग्रामीणमधील बारामती लोकसभा व शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीतील पारंपारिक जागांची खांदेपालट होणार असल्याचेही वृत्त आहे. नवीन संकेतानुसार बारामतीची मूळची भाजपाची असणारी जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे.

त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये प्रथमच सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार असा नणंद भाऊजयचा सामना रंगणार आहे. तर शिरुर लोकसभेची महायुतीमध्ये मूळची शिवसेनेची असणारी जागा आता भाजपा लढवणार असल्याचे समजते. भाजपामधून आता प्रदीप कंद गेली महिनाभरामध्ये शिरूर मतदार संघातील ग्रामस्थांच्या गाठीभेटी वाढवल्या आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे सलग ३ वेळा प्रतिनिधीत्व करणारे यांना महायुती सरकारने नुकतेच म्हाडाचे अध्यक्षपद दिले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आढळरावांना हे पद मिळाल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. संभाव्य उमेदवार प्रदीप कंद हे लोणीकंद गावचे रहिवासी असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. याशिवाय चालु पंचवार्षिक जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपाच्या वतीने निवडणूक लढवत राष्ट्रवादीच्या एकतर्फी सत्तेला सुरुंग लावत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश घुले यांचा पराभव करत जायंट किलर ठरले होते. २००७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्रामध्ये १८ हजाराच्या विक्रमी मतांनी निवडून आले होते. पुणे भाजपाचे सध्याचे एकमेव आमदार असणारे राहुल कुल हे प्रदीप कंद यांचे महाविद्यालयीन जीवनापासुन मित्र आहेत.