डॉ.अमोल कोल्हेंच उमेदवार, पण जिंकणार कोण ? |थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
760

पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि मावळ अशा तीनही लोकसभा मतदारसंघात भाजपने जोरदार मोर्चेबांधनी सुरू केल्याने शिवसेना शिंदे गटात मोठी अस्वस्थता आहे. पूर्वी म्हणजे २०१९ मध्ये युतीच्या जागावाटपात बारामती लोकसभा भाजपकडे तर शिरूर आणि मावळ लोकसभा शिवसेनेकडे होते. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेला त्यानुसारच जागावाटप असेल असे गृहित धरून शिंदे गट कामाला लागला. शिरूरमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उध्दव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मावळ लोकसभा मतदारसंघातसुध्दा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाणे पसंत केले. आढळराव आणि बारणे यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार असे जवळपास निश्चित आहे. दरम्यान, भाजपने शिरूर मध्ये जोरदार मोहीम आखली आणि संपर्क अभियान राबवले. कार्यकर्त्यांचे मेळावे, समाज घटकांच्या बैठका, गाठीभेटी, प्रवेश सुरू आहेत. केंद्रीय मंत्र्यांचा सहा महिन्यापूर्वी दोन दिवसांचा या मतदारसंघात विशेष दौरा झाला होता. आता पुन्हा केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी शनिवार-रविवार असे दोन दिवसांत हा मतदारसंघ पिंजून काढला. हडपसरला युवकांचा मेळावा घेतला. खेड तालुक्यातील डेहणे गावात आदिवासी बांधवांची बैठक घेतली. आंबेगाव तालुक्यातील बैलगाडी शर्यतीला खास उपस्थिती लावली. जुन्नरमध्ये लाभार्थींच्या भेटीगाठी घेतल्या. विशेष म्हणजे या दौऱ्यात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते.

भाजप आणि शिंदे गट मिळून लोकसभा लढणार असे भाजपचे नेते सांगत असले तरी शिरूर मध्ये हालचाली वेगळ्यात असल्याने संभाव्य उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे टेन्शन वाढले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी हडपसरच्या मेळाव्यात आपल्याला उमेदवारी मिळाल्यास लढण्याची तयारी आहे, असे म्हटल्याने भाजपचे मनसुबे ठिक नसल्याचा अंदाज शिंदे गटाला आणि विशेषतः आढळराव यांना आला. भाजप अशी दुटप्पी भूमिका घेत असल्याने आढळराव यांच्या उमेदवारीवर गदा येते की काय अशी शक्यता व्यक्त केली जाते. भाजपने शिंदे गटावर दबाव म्हणून जाणीवपूर्वीक महेश लांडगे यांचा पत्ता खुला केला, असेही बोलले जाते. दुसरे महत्वाचे म्हणजे मध्यंतरी शिंदे गटाच्या १३ खासदारांची एकनाथ शिंद यांच्या बरोबर एक बैठक पार पडली, त्यावेळी धनुष्य चिन्ह घेऊन आणि शिंदे यांचा फोटो पोस्टरवर ठेवून मतदार बधनार नाही म्हणून कमळ चिन्ह पाहिजे, असा सर्व खासदारांचा सूर आला. त्यातून शिंदे गटाची असाहयता समोर आली आणि भाजपने उचल खाल्ली. जिथे जिथे शिंदे समर्थक आजी-माजी खासदार आहेत तिथे तिथे जोर लावायची नवीन रणनिती भाजपने तयार केली. त्यामुळेच शिरूर मध्ये भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले असून अशा पध्दतीने शिंदे गटच हायजॅक करायचा भाजपचा डाव दिसतोय.

उमेदवार आढळराव की लांडगे –
लोकसभा निवडणूक पूर्व जी काही सर्वेक्षणे आलीत त्यात महाआघाडी म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस मिळून ४८ पैकी ३६ ते ४० जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचाच दुसरा अर्थ भाजप आणि शिंदे गट मिळून अवघ्या भाजपला ८ आणि शिंदे गटाला २-४ अशा १२ जागा मिळतील. अशा बिकट परिस्थित भाजपने शिंदे गट आपल्यात सामावून घ्यायचा विचार सुरू केला आहे. आढळराव यांना अडजस्ट करायला भाजप तयार नाही, असेच चित्र आहे. लोकसभा उमेदवारी देताना भाजपने काही कठोर निकष लावायचे ठरवले आहे. त्यात एकाच घरातील खासदार-आमदार नसावा, म्हणजेच घराणेशाहीला पूर्ण विराम द्यायचा. जास्तीत जास्त नवीन चेहरे द्यायचे आणि वयाची अट म्हणून ६५ च्या आतीलच उमेदवार असावा, असे ठरवले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील याच कुठेही बसत नसल्याने भाजपने महेश लांडगे यांचे नाव पुढे काढले असावे, असे म्हणतात. खेड, आंबेगाव, जुन्नर पट्ट्यातील ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यामागे भाजपचीच रणनिती आहे. त्यामुळेच शिंदे गटाचे आढळवार पाटील यांना बाजुला ठेवून भाजपची स्वतंत्र मोर्चेबांधनी सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या उमेदवारीसाठी आजही खूप आग्रही आहेत. तीन वेळा खासदार राहिलेले आढळराव हेच राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार अमोल कोल्हे यांना तोंड देऊ शकतील. पूर्वीचा तीन निवडणुकांची दांडगा अनुभव गाठिशी असल्याने आढळराव यांनाच संधी द्यावी म्हणून शिंदे गटाचे मंत्रीगणसुध्दा त्यासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे भोसरीकर आमदार महेश लांडगे यांना तयारीसाठी भाजपने मैदान दाखवल्याने हा पहिलवान गडी दंड थापटू लागल्याने आता उमेदवा आढळराव की लांडगे हा पेच आहे. उमेदवारीसाठी भाजपने ठरवलेले सर्व निकष आमदार महेश लांडगे पूर्ण करतात म्हणून ते तयारीला लागल्याचे सांगण्यात आले.

डॉ. कोल्हे यांना पुन्हा संधी –
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांचा आणि मतदारसंघाचा सोमवारी आढावा घेतला. शिरूर मधून विलास लांडे यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली, पण खुद्द पवार साहेबांनीच डॉ.कोल्हे हेच उमेदवार असतील असे ठामपणे सांगितले. इतकेच नाही तर कामाला लागा असा आदेशही दिला. निवडणुकीला भले एक वर्ष बाकी आहे. या काळात आणखी काहीपण घडू शकते. कारण आजच संपूर्ण राजकारणच अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेले आहे. आज डॉ. कोल्हे यांचे नाव पवार यांनी सांगितल्याने राष्ट्रवादी कामाला लागली. आज खासदार म्हणून डॉ. कोल्हे हे देशातील उत्तम संसदपटू आहेत. त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या कार्याची, त्यांच्या वक्तृत्वाची वाहव्वा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या जबरदस्त वठवल्या की ते आजही लोकप्रियतेच्या शिखरावर कायम आहेत. शरद पवार यांच्यालेखी डॉ. कोल्हे हे लंबी रेस का घोडा आहेत. अजित पवार यांना तेच खुपते म्हणून तिथेच थोडेसे दुखते. चार वर्षांत खासदार म्हणून लोकसंपर्कात डॉ. कोल्हे कमी पडले असा सार्वत्रिक आक्षेप आहे. वर्षभरात म्हणजे ३६५ दिवसांत दौरे, गाठिभेटींने सगळी गावे पिंजून काढली आणि ती कमतरता भरून काढली तर लोक पुन्हा महाआघाडी म्हणून डॉ. कोल्हे यांच्या बरोबर येतील. राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांची गोळाबेरिज मोठी आहे. पूर्वी आढळराव पाटील यांना मिळालेली मते शिवसेना म्हणून अधिक होती. राष्ट्रवादीचे पाचही आमदार ताकदिचे आहेत. डॉ. कोल्हे कधीच उपलब्ध नसतात, ही त्यांची नाराजी दूर करावी लागेल. असे झालेच तर शिंदे आणि भाजप एकत्र आले तरी फरक पडणार नाही. खासदार डॉ. कोल्हे यांच्यासारखे व्हिजनरी युवा नेतृत्व हीच राष्ट्रवादीची आज सर्वात मोठी भक्कम बाजू आहे. माजी खासदार आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे तिथे अनेक अर्थाने थिटे पडतात. अजून वर्ष आहे, तोवर वाट पाहू.