डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण चिंताजनक

21

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) : डॉलरच्या तुलनेत रुपयाने २२ सप्टेंबर २०२२ रोजी नवीन विक्रमी नीचांकी पातळी गाठली. सुरुवातीच्या व्यवहारातच रुपया ५१ पैशांनी घसरून ८०.४७ च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला. महागाई नियंत्रणासाठी यूएस फेडने सलग तिसर्‍यांदा व्याजदर वाढवल्यानंतर डॉलर निर्देशांकात मजबूत प्रदर्शन दिसून आले. त्याचा दबाव भारतीय रुपयावर पडला, त्यामुळे देशांतर्गत चलनात मोठी घसरण झाली. रुपयाचा व्यवहार ८०.२७ वर सुरू झाला आणि सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये तो ८०.४७ रुपये प्रति डॉलर या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला. रुपयाची दिवसेंदिवस होणारी घसरण भारतीय अर्थव्यवस्था कुठे आहे याचे निदर्शक असल्याने चिंता व्यक्त केली जातं आहे.

बुधवारी, २१ सप्टेंबर रोजी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ७९.९६ वर बंद झाला होता. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ७९.७९ वर उघडला आणि दिवसभराच्या व्यवहारात सातत्याने घसरण झाली. २० जुलै रोजी प्रथमच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आणि ८० च्या वर ८०.०५ वर बंद झाला.
डॉलर निर्देशांक १११ च्या वर

व्याजदरांबाबत फेडच्या निर्णयानंतर डॉलर इंडेक्स १११ च्या वर व्यवहार करत आहे. डॉलर निर्देशांक मजबूत झाल्यामुळे भारतीय रुपया आणि इतर आशियाई चलनांमध्ये घसरण दिसून आली आणि ते नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहेत. युरो डॉलरच्या तुलनेत ०.९८२२ या २० वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणि डॉलरच्या तुलनेत पौंड १.१२३४ या २९ वर्षांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे. चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये यूएस सेंट्रल बँक यूएस फेडरल रिझर्व्हने बुधवारी सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ केली. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदर ०.७५% वाढवले आहेत. तसचे यूएस फेडने संकेत दिले आहेत की ते येत्या बैठकीत व्याजदर देखील वाढवू शकतात.

यापूर्वी २७ जुलै रोजी व्याजदरात वाढ करण्यात आली होती. यूएस फेड महागाईमुळे चिंतेत आहे. यूएस फेड महागाई २% पर्यंत खाली आणण्यासाठी वचनबद्ध आहे. मध्यवर्ती बँकेचा अंदाज आहे की ते 2023 पर्यंत व्याजदर ४.६ टक्क्यांपर्यंत नेऊ शकतात. बेंचमार्क दर वर्षाच्या अखेरीस ४.४ टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. यानंतर २०२३ मध्ये ४.६ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

रुपयाची आणखी किती घसरण…
फेडरल रिझर्व्हच्या जोरदार विधानानंतर सर्व प्रमुख चलनांमध्ये डॉलरच्या तुलनेत घसरण होऊ शकते. रुपयाची घसरण होईल. भारतीय रुपया लवकरच ८१ ते ८२ ची पातळी दाखवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.