डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची छबी आणि स्वाक्षरी आता लेखणीवर

0
279

‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, असा संदेश देत बहुजनांना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची छबी आणि स्वाक्षरी आता लेखणीवर आली आहे. ‘रायटिंग वंडर्स’ संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेल्या विशेष पेनची निर्मिती करण्यात आली असून या सिग्नेचर पेनच्या आवृत्तीचे अनावरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

डाॅ. गोसावी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मौलिक विचारांचा वारसा युवा पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आणि वाचनाप्रमाणेच लेखन संस्कृतीच्या प्रसारासाठीही डॉ. बाबासाहेबांच्या सिग्नेचर एडिशनच्या पेनचे विशेष महत्त्व आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी या उपक्रमातून प्रेरणा मिळेल.

कांबळे म्हणाले की, लेखणी हे सर्वांत मोठे शस्त्र आहे. स्वतः बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत विपुल लेखन केले. आज लेखनाची माध्यमे बदलली असली, तरी कागदावर लिहिण्याची बाब आजही एक विशेष आनंद देणारी आहे. हे लक्षात घेऊन डिक्कीच्या माध्यमातूनही बाबासाहेबांच्या या पेनचा आणि त्यामागील विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या लेखणीसाठी उच्च दर्जाच्या प्रिमिअम जर्मन रिफीलचा वापर केला आहे. दोन टोन मेटल बाॅडी असून, डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा आणि स्वाक्षरी त्यावर कलात्मक पद्धतीने कोरली आहे. हे पेन ४५० रुपयांत तर डायरी २८० रुपयांत उपलब्ध करण्यात आली आहे. डायरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संक्षिप्त चरित्र आणि छायाचित्र आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील व्हीनस ट्रेडर्स जवळील ‘रायटिंग वंडर्स’ येथे उपलब्ध असेल. – सुरेंद्र करमचंदानी, रायटिंग वंडर्स

आंबेडकर जयंती आणि राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा योग जुळून आला असून या कार्यक्रमास रायटिंग वंडर्सचे सुरेंद्र करमचंदानी, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. विजय खरे आणि ॲड. मंदार जोशी या वेळी उपस्थित होते.