ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी लोकसभेसाठी इच्छुक

0
225

पुणे, दि. १ (पीसीबी) – कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणारा पैलवान विजय चौधरी यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान विजय चौधरी यांनी आपली राजकीय महत्वकांक्षा जाहीर केली आहे. कुस्तीच्या आखाड्यानंतर आपण राजकारणाचा आखाडा गाजवण्याच्या तयारीत असल्याचे विजय चौधरी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले. पैलवान विजय चौधरी यांनी आपण राजकारणात एन्ट्री करणार असल्याचे सांगताच चर्चा सुरु झाली आहे.

विजय चौधरी यांना कोणी दिली ऑफर?
विजय चौधरी यांना राजकारणात कोणत्या पक्षाकडून ऑफर आली आहे का? यावर बोलताना सांगितले की, अद्याप कुठल्याच पक्षाची आपणास ऑफर नाही. मात्र भारतीय जनता पक्ष आपला आवडता पक्ष आहे. त्या पक्षाकडून संधी मिळाल्यास आपण लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेसुध्दा चौधरी यांच्याबाबात सकारात्मक आहेत, असे समजले.

कोणता मतदार संघ निवडणार
विजय चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील रहिवाशी आहेत. चाळीसगाव तालुक्यातील सायगाव हे त्यांचे गाव आहे. यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात जर संधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जळगाव लोकसभेत सध्या भाजपचे उन्मेष पाटील खासदार आहेत. भाजप उन्मेष पाटील यांना पर्याय शोधत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यामुळे विजय चौधरी जळगाव लोकसभा मतदार संघातून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.