ट्राफिक वॉर्डनला मारहाण; कार चालकास अटक

127

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – रस्त्यात लावलेल्या कारचा ट्राफिक वॉर्डनने फोटो काढला. यावरून एकाने ट्राफिक वॉर्डनवर कार चालवली. त्यानंतर वॉर्डनला शिवीगाळ, मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 3) दुपारी जुना जकात नाका चौक, चिंचवड येथे घडला.

हंसराज दगडू ठाकरे (वय 38, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी शरद बंडगर (वय 30) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्राफिक वॉर्डन म्हणून काम करतात. ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सोमवारी दुपारी चिंचवड येथील जुना जकात नाका चौक जैन शाळा कॉर्नरवर वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपी ठाकरे हा एमएच 14/ईयु 0048 या कार मधून आला. त्याने उड्डाणपुलाच्या खाली भर रस्त्यात कार लावली. त्यामुळे बंडगर यांनी ठाकरे याला कार रस्त्यातून काढण्यास सांगितले. त्यावर ठाकरे याने कार पुढे घेत नाही, काय करायचे ते कर, असे अर्वाच्यपणे म्हटले. वाहतुकीस अडथळा होत असल्याने बंडगर यांनी कारवाईसाठी कारचा फोटो काढला. त्यावरून ठाकरे याने बंडगर यांच्या अंगावर कार चालवली. त्यात बंडगर बचावले. त्यानंतर कार मधून उतरून शिवीगाळ करत फोटो का काढला असा त्याने जाब विचारला. त्यांना मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी ठाकरे याला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.