ट्रक अचानक रस्त्यात थांबल्याने पाठीमागून दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

0
440

कासारवाडी,दि. १६ (पीसीबी) : ट्रक चालकाने अचानक ब्रेक लाऊन ट्रक रस्त्यात थांबवला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. तर एकाचा मृत्यू झाला. ही घटना 28 ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर कासारवाडी येथे घडली.

केशव व्यंकट आवळे असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. कंथक प्रकाश म्हस्के (वय 24, रा. मोशी प्राधिकरण) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एमएच 01/डीआर 9309) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी म्हस्के, त्यांचे मित्र केशव आणि अमोल बालाजी आवळे असे म्हस्के यांच्या दुचाकीवरून पुणे नाशिक महामार्गावरून जात होते. त्यांच्या समोरून जाणाऱ्या ट्रक चालकाने ट्रकचा अचानक ब्रेक लाऊन रस्त्यात ट्रक थांबवला. त्यामुळे म्हस्के यांच्या दुचाकीची ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसली. या अपघातात म्हस्के यांच्या पायाला गंभीर इजा झाली. तर त्यांचा मित्र केशव आवळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पिंपरी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान केशव यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.