टीएमसी खासदार नुसरत जहाँ यांच्या व्हॅलेंटाईन क्लिपवर वादळ

0
143

कोलकाता, दि. १५ (पीसीबी) – पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर महिलांचा लैंगिक छळ केल्याचे आरोप होत आहेत. तृणमुलच्या पक्ष कार्यालयात कथित लैंगिक शोषण झाल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. याप्रकरणी काही महिला संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या प्रकरणावरून भारतीय जनता पार्टी सत्ताधारी टीएमसीविरोधात आक्रमक झाली आहे. संदेशखाली हा भाग टीएमसी खासदार नुसरत जहाँ यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे नुसरत जहाँ यांनी यावर कुठलीही कारवाई केली नसल्याचा दावा करत जहाँ यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. परंतु, खासदार नुसरत जहाँ यांनी याप्रकरणी मौन बाळगलं आहे.

दरम्यान, नुसरत जहाँ यांच्या समाजमाध्यमांवरील एका पोस्टमुळे भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. नुसरत जहाँ यांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या (१४ फेब्रुवारी) दिवशी त्यांच्या पतीबरोबरचा एक व्हिडीओ आणि काही फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. या व्हिडीओवरून भारतीय जनता पार्टीने नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पार्टीने नुसरत जहाँ यांचा पतीबरोबरचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यासह कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, एका बाजूला संदेशखाली भागात महिला त्यांच्या आत्मसन्मानासाठी लढत आहेत आणि दुसऱ्या बाजूला नुसरत जहाँ या व्हॅलेन्टाईन डे साजरा करत आहेत. लोक कुठल्या गोष्टीला प्राथमिकता देतात ते महत्त्वाचं असतं. संदेशखाली येथील महिला त्यांच्या सन्मानासाठी आंदोलन करत आहेत. त्याचवेळी बशीरहाटच्या खासदार तृणमूलच्या नेत्या व्हॅलेन्टाईन डे साजरा करत आहेत.