टाटा मोटर्स कलासागर सुवर्ण महोत्सवानिमित्त तीन दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल

52

पिंपरी दि. १६ (पीसीबी) – टाटा मोटर्स कंपनीची सांस्कृतिक शाखा असणाऱ्या टाटा मोटर्स कलासागर या संस्थेला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्त टाटा मोटर्स कलासागर सुवर्ण महोत्सव साजरा करणार असून 17, 18 व 19 ऑगस्ट अशा तीन दिवसांत मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. 

‘टाटा मोटर्स कलासागर’चे अध्यक्ष सुनील सवाई यांनी ही पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी टाटा मोटर्स कलासागरचे सरचिटणीस रोहित सरोज, समन्वयक मयूरेश कुलकर्णी तसेच टाटा मोटर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक (कम्युनिकेशन्स) अमर पैठणकर आदी उपस्थित होते. 

टाटा मोटर्स कलासागरच्या सुवर्णमहोत्सवाचे सर्व कार्यक्रम चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी साडे नऊ ते दुपारी चार व सायंकाळी सहा ते रात्री नऊ या दोन सत्रात सादर होणार आहेत. यात कला प्रदर्शन, विविध गुणदर्शन, एकांकिका, समूह नृत्य स्पर्धा, स्मरणिका प्रकाशन, ऑर्केस्ट्रा व इतर कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. 19 ऑगस्टला संध्याकाळी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास टाटा मोटर्स कंपनीचे उच्चपदस्थ उपस्थित राहणार आहेत.

 टाटा मोटर्स कलासागर ही टाटा मोटर्सची 1972 साली स्थापन झालेली एक सांस्कृतिक शाखा आहे. दिवंगत लीलाताई मूळगांवकर यांच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना झाली. कलासागरने कला, संगीत, साहित्य आणि नाटक या चार शाखांसह कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातिल सदस्यांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला आहे. कलासागर ही कर्मचाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांसाठी स्थापन केलेली व चालविलेली संस्था आहे. गेल्या पाच दशकांमध्ये यामुळे कर्मचाऱ्यांची सृजनशीलता विकसित होण्यास मोठा हातभार लागला आहे.

टाटा मोटर्स कलासागरच्या माध्यमातून कंपनीतील सहकारी कामगार आणि त्यांची कुटुंबे एकत्र आणली आहेत. कला आणि संस्कृतीच्या सेवेत इतके दिवस कार्यरत असलेली टाटा मोटर्स ही एकमेव कॉर्पोरेट कंपनी आहे. कलासागरतर्फे महाविद्यालये, आदिवासी समुदाय स्वंयसेवी संस्था, सांस्कृतिक संस्था आणि कार्पोरेट हाऊसेस, सामाजिक संघटना यांना निमंत्रित केले आहे. नागरिकांनीही यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन टाटा मोटर्स कलासागरतर्फे करण्यात आले आहे.