ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरून नेणाऱ्या तरुणाला अटक

0
373

चाकण, दि. १८ (पीसीबी) – ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या तरुणाने सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. दागिने चोरून नेताना त्याची चोरी पकडली गेली. दुकानदाराने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी (दि. १७) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास माणिक चौक, चाकण येथील रेणुका ज्वेलर्स या दुकानात घडली.

सर्फराज उर्फ सोनू अन्सारी (वय १९, रा. बर्गेवस्ती, चाकण. मूळ रा. जमोरी, ता. रोहतास, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत दत्तात्रय बागडे (वय ४६, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे माणिक चौक चाकण येथे रेणुका ज्वेलर्स हे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी दुकानात असताना आरोपी ग्राहक बनून दुकानात आला. त्याने कानातले खरेदी करण्याचा बहाणा करून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीची नजर चुकवून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची रिंग चोरली. रिंग घेऊन पळून जात असताना हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आला. त्यांनी लोकांच्या मदतीने सर्फराज याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.