जो मंत्रालयात ठाण मांडून बसतो त्याला पैसे मिळतात

0
168

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. जो मंत्रालयात ठाण मांडून बसतो त्याला पैसे मिळतात, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, ७ तारखेपासून हिवाळी अधिवेशन होत असून राज्यामध्ये अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत, ते सोडवले जातील अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे आमदारांच्या निधीवाटपावरुन सत्ताधाऱ्यांकडून दुजाभाव केला जातोय.
पाटील पुढे म्हणाले, हाजीर तो वजीर अशी सध्याची परिस्थिती आहे. जो मंत्रालयात जातो ठाण मांडून बसतो तो जास्त पैसे मिळवतो. सत्ताधारी आमदारांमध्येच ही स्पर्धा असून समान निधीचं वाटप होत नाहीये. सरकारमधल्या पक्षांमध्येच असमानतेचं धोरण आहे. बाकी विरोधकांचं तर विचारायलाच नको.

”जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सरकार याच्यावर निर्णय घेत नाहीये. जाती-जातींमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यासाठी जनगणना आवश्यक आहे. यासह आरक्षण आणि इतर प्रश्न सरकारने सोडवणं गरजेचं आहे.” असं म्हणत जयंत पाटलांनी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणाऱ्या प्रश्नांविषयी माहिती दिली.