जैन स्थानकात मतदारांनी घेतली मतदानाची शपथ – – सामाजिक बांधिलकीतून लाखो मतदारांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविणार…

0
42

पिंपरी, दि.१० (पीसीबी) –
अहिंसा परमं धर्म या ब्रीदवाक्याचे पालन करणा-या सर्व जैन बांधवांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे आणि येत्या २० नोव्हेंबर रोजी येणा-या विधानसभा निवडणूकीतही मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क बजावून सक्षम राष्ट्र घडविण्यासाठी योगदान देखील द्यावे असे आवाहन आकुर्डी निगडी प्राधिकरण येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष ललवाणी यांनी केले.

२०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आकुर्डी येथील जैन स्थानकात मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी थोर साध्वी डॉ.राजश्रीजी म.सा., डॉ.मेधाश्रीजी म.सा., समीक्षाजी म.सा. आणि जिनाज्ञाश्रीजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थ‍ितीत सर्वांनी “ आम्ही भारतीय नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” अशी शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमास स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आकुर्डी निगडी प्राधिकरण जैन श्रावक संघाचे पदाधिकारी संतोष कर्नावट, धनराज छाजेड, राजेंद्र छाजेड, नेनसुख मांडोत, जवाहर मुथा, पोपटलाल कर्नावट, हिरालाल लुणावत, नितीन छाजेड, सुर्यकांत मुथियान, मोतीलाल चोरडिया, शारदा चोरडिया, वंदना छाजेड, निता ओसवाल, मंजुश्री संचेती, विजया कर्नावट, अरुणा बोरा, साधना खिंवसरा, लिलाबाई छाजेड यांसह स्वीप विभागाचे संदीप सोनवणे, महालिंग मुळे, दिनेश जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मतदान प्रक्रियेबाबत माहिती दिली. या कार्यक्रमास शासकीय मतदान मार्गदर्श‍िकेचेही वाटप जैन स्थानकात करण्यात आले. तर स्थानकातील उपस्थित मतदारांनी सामाजिक बांधिलकीतून मतदान जनजागृतीचा हा संदेश लाखो समाजबांधवांपर्यंत तसेच नागरिकांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन दिले.

२०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सोसायटया, शैक्षणिक संस्था, गर्दीची ठिकाणे, विविध समाज मंदिरांची ठिकाणे, प्रवासी वाहतुक संस्थांची ठिकाणे यासह सोशल मिडीयाद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत असून त्यासाठी मतदारांचा उत्साह जाणवत असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी सांगितले.