जे. पी. नड्डा यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षपद कायम

62

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – जे. पी. नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा काळ वाढवण्यात आला आहे. जून २०२४ पर्यंत जे. पी. नड्डाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा काही वेळापूर्वीच केली. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ दुसऱ्या कुणाच्या गळ्यात पडणार का? याची चर्चा सुरू होती. मात्र तसं घडलेलं नाही.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने जे. पी. नड्डांकडे संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. जे. पी. नड्डा यांनी सोमवारी एक भाषण केलं होतं त्यात ते भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले होते की मी तुम्हाला सूचना देतो, माहिती घेतो हे कधी तुम्हाला आवडतही नसावं पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी ही जबाबदारी आहे. त्यापुढेही देत राहणार आहे, असंही सांगितलं होतं. त्यामुळे जे. पी. नड्डा यांना मुदतवाढ मिळू शकते याचे संकेत मिळालेच होते. त्यानुसार भाजपाच्या कार्यकारणीमध्ये राजनाथ सिंह यांनी जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला जावा हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सगळ्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवला गेला आहे अशी घोषणा केली.

जे. पी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आल्यानंतर सर्वात मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे ते म्हणजे लोकसभा निवडणूक. कारण २०१४ मध्ये भाजपाला २८० हुन अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राजनाथ सिंह हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यानंतर २०१९ मध्ये अमित शाह हे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यावेळी भाजपाला ३०३ जागा मिळाल्या आणि प्रचंड बहुमत मिळालं. आता जे. पी. नड्डा भाजपाचं ४०० हुन अधिक जागांचं लक्ष्य पूर्ण करणार का हे पाहणं मह्त्तवाचं असणार आहे.

१९८६ पासून जे. पी. नड्डा हे राजकारणात सक्रिय झाले. वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली होती. जे. पी. नड्डा हे अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. कमीत कमी प्रकाशझोतात राहून जास्तीत जास्त काम करणं हे जे. पी. नड्डा यांचं कौशल्य आहे. १९८६ ते १९८९ या कालावधीत जे. पी. नड्डा हे अभाविपचे राष्ट्रीय सचिव होते.

त्यानंतर भारतीय युवा मोर्चा अर्थात भाजयुमोच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी हिमाचलमधून आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकून आले. त्यानंतर १९९८ आणि २००७ या दोन्ही वर्षातही त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली. या सगळ्या प्रवासानंतर नितीन गडकरी यांच्यामुळे जे. पी. नड्डा यांचा प्रवेश भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात झाला. २०१२ मध्ये त्यांनी राज्यसभा लढवली. त्यानंतर ते अमित शाह यांचे विश्वासू सहकारी झाले.