जेष्ठांसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा एकाच रुग्णालयात

0
234

पिंपरी, दि.२ (पीसीबी) – ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोई एकाच रुग्णालयात उपलब्ध होतील यासाठी आणि कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल सारखे सोयी सुविधा देण्यासाठी देखील महापालिका नियोजन करीत आहे तसेच तरुण पिढीने आज ना उद्या आपण देखील जेष्ठ नागरिक होणार होत या विचारातून आपल्या आई-वडिलांची काळजी घ्यावी असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छाही दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, या दिनानिमित्त समाज विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, पदाधिकारी बाबुराव फुले, ईश्वरलाल चौधरी, शांताराम जाधव, हेमचंद्र जावळे तसेच शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केलेल्या प्रास्ताविकात समाज विकास विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

आजच्या कार्यक्रमात आयुक्त सिंह यांच्या हस्ते शहरातील जून्या १०२ ज्येष्ठ नागरिक संघाना साउंड सिस्टीम देऊन तर नवीन २६ ज्येष्ठ नागरिक संघांना प्रत्येकी १ टेबल आणि २५ खुर्च्या देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी “आम्ही घाण करणार नाही व घाण करून देणार नाही तसेच स्वच्छतेच्या नियमांचे आम्ही पालन करू” अशी स्वच्छतेची शपथ देखील ज्येष्ठ नागरिकांनी घेतली, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले. या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांचे वतीने तयार करण्यात आलेल्या आनंद मेळावा या पुस्तकाचे अनावरण आयुक्त सिंह यांच्या हस्ते आले.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांसाठी आरोग्य विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, डॉ.विलास सोमवंशी यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना उत्तम स्वास्थासाठी उपयुक्त आरोग्य विषयक सल्ला दिला.

कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी शहरातील रस्ते तसेच विविध विकास कामांची माहिती दिली तर अशोक देशमुख यांनी “ज्येष्ठ नागरिकांचे आनंदी जीवन” या विषयावर व्याख्यान दिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित स्नेहभोजनानंतर दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत केला होता.

आजच्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष वृषाली मरळ, कार्याध्यक्ष बाबुराव फुले, सरचिटणीस विश्वलाल चौधरी, सह सरचिटणीस शांताराम जाधव, कोषाध्यक्ष हेमचंद्र जावळे त्याचप्रमाणे रामदास जगदाळे, तुकाराम कुदळे, माधव अडसुळे, सुनीता कोकाटे, अनिल बडगुजर, वसंत तावरे, केशव सोनवणे, पुरुषोत्तम मांडे, शकुंतला महामुनी, सुभाष सराफ, कमलिनी जगताप, दिलीप पाटील, विजय सिनकर, सुधाकर सूर्यवंशी, अशोक पाटील, उत्तरेश्वर तोडकर, अशोक लाटे, अलका मोरे, वसंतराव दंडवते, युवराज थोरात, अरुण बागडे, बाळकृष्ण गायकवाड या ज्येष्ठ मान्यवरांना तर व्याख्याते अशोक देशमुख आणि डॉ.विलास सूर्यवंशी यांना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त अजय चारठाणकर, सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी मानले.