जुन्या बॉयफ्रेंडला जेलमध्ये पाठवण्यासाठी चाैघांनी सामूहिक बलात्कार केल्याची रचली फिल्मी स्टोरी; अल्पवयीन मुलीचा कारनामा उघड

0
54

बारामती : बारामती मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुन्या मित्राला जेलमध्ये पाठवण्यासाठी अल्पवयीन मुलीने दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत सामूहिक बलात्काराचा बनाव रचल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, (दि.१३) बारामतीमधील सामाजिक कार्यकर्ते मछिंद्र टिंगरे यांना अल्पवयीन मुलीने फोन करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले. एका ऊसाच्या शेतात नेवून त्या मुलाने आणखी तीन मुलांना बोलावून घेत माझ्यावर सामूहीक अत्याचार केल्याचे म्हंटले आहे. त्यानंतर टिंगरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ कामाला लागली.मुलीकडून हुबेहूब कथानक सादर..

मुलीकडून अत्यंत हुबेहूब कथानक सादर करण्यात आले. अगदी ती फोनवर बोलत असताना रडत होती. त्यामुळे तिच्यासोबत असा काही प्रकार घडला असल्याचं नाकारता येत नव्हतं. वरिष्ठ पोलिसांनी देखील याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर अल्पवयीन मुलीला महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस करण्यात आली. परंतु, अल्पवयीन मुलगी प्रत्येक वेळी-वेगवेगळी उत्तर देत होती. महिला अत्याचाराच्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली होती. या प्रकरणात अजित पवारांनीही तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.पोलिसांनी सीसीटीव्ही पाहणी करत तपास सुरु केला. मात्र मुलगी प्रत्येकवेळी आपले म्हणणे बदलत राहिली. पोलीस वारंवार सांगूनही आणि विचारपूस करूनही अल्पवयीन मुलगी प्रश्नांची नीट उत्तरे देत नव्हती. अल्पवयीन मुलगी ही पोलिसांची दिशाभूल करत असल्याचं पोलिसांना संशय आला.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर सर्व फिल्मी स्टाईल कथानक समोर आलं. पहिल्या मित्राला जेलमध्ये पाठवण्यासाठी एका मालिकेतील घटना बघून दुसऱ्या मित्रांसोबत सोबत सामूहिक बलात्काराचा बनाव रचल्याचं मुलीनं अखेर पोलिसांसमोर कबूल केले आहे.