जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली, एकास अटक

0
208

देहूरोड, दि. १८ (पीसीबी) – व्यावसायिकाला आणि त्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत ७८ हजार रुपये खंडणी घेतली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना जानेवारी २०२२ ते १२ मार्च २०२३ या कालावधीत ओम लँड डेव्हलपर्स तळवडे येथे घडली.

सुधीर सोपान जाधव असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप उर्फ संजय आनंदा काळोखे (वय ४०, रा. तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. सुधीर जाधव याने फिर्यादी यांना धमकी दिली. तू प्लॉटिंग व्यवसायात भरपूर पैसा कमावला आहे. माझ्यावर खून, बलात्काराची केस असून मी पिंपरी चिंचवडचा भाई आहे. तुला व्यवसाय करायचा असेल तर दरमहा दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. पैसे दिले नाहीत तर जीवे मारीन, अशी सुधीर याने फिर्यादीस धमकी दिली. फिर्यादींकडून ३८ हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. त्यानंतर पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी करून जबरदस्तीने ४० हजार रुपये काढून घेतले. पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.