जिथे आहात तिथेच खंबीरपणे उभे राहा, दिलीपराव देशमुखांचा पुतण्यांना सल्ला

0
245

लातूर, दि. १८ (पीसीबी) – निवळा येथील विलास साखर कारखाना आणि तिथे उभारण्यात आलेल्या दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळण्याचा अनावरणाचा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री अशाक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निवळी येथील कार्यक्रमाला राज्यातील सर्वच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी लावलेली हजेरी यातून मराठवाड्यातील काँग्रेसचे नेतृत्व लातूरच्या देशमुखांच्याच हाती पुन्हा येणार याचे संकेत दिले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमित देशमुख यांना आता बाहेर पडा, राज्यात फिरा आणि काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, हे केलेले आवाहनही मराठवाड्यातील काँग्रेसची पुढील दिशा आणि त्याचे नेतृत्व कोण करणार? हे दर्शवणारे होते. या सगळ्यावर अमित, धीरज आणि रितेश देशमुख यांचे काका, विलासरावांचे बंधु माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आपल्या पुतण्यांना दिलेला सल्ला अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
जिथे आहात तिथेच खंबीरपणे उभे राहा, असे सांगत दिलीपराव देशमुख यांनी पुतण्यांच्या भाजप प्रवेशावरील चर्चांना पूर्णविराम देण्याचे काम केले. काका मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो, अशी भावनिक साद घालत रितेश देशमुख यांनी आपल्या जीवनात काका दिलीपराव देशमुख यांचे स्थान किती मोठे आहे, हे अधोरेखित केले. वडील विलासराव देशमुख आणि त्यांच्या पश्चात काका दिलीपराव यांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या या पुतण्यांनी त्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही.

अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्याने मराठवाड्यात निर्माण झालेल्या काँग्रेस नेतृत्वाची उणीव लातूरच्या देशमुख कुटुंबाकडून भरून काढली जाणार हेच आजच्या निवळी येथील कार्यक्रमातून स्पष्ट झाले. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा राजकीय वारसा अमित, धीरज आणि रितेश देशमुख यांनी समर्थपणे पुढे नेण्यासाठी आणि काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात फिरावे, असे आवाहन केले. याहीपेक्षा विशेष म्हणजे काका दिलीपराव यांनी दिलेला जिथे आहात तिथेच खंबीरपणे उभे राहा, हा सल्ला पुतण्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.