जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला

0
95

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) मुंबई, : विशाळगडावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजे यांना लक्ष्य केले होते. त्यावरून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. मुंबईतून ठाण्याकडे आपल्या घराच्या दिशेने आव्हाड जात असताना फ्री वे जवळ आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या तिघांनी हल्ला केला. हल्ला करताना छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.

कोल्हापुरात जिल्ह्यातील विशाळगड व गाजापुरात कट रचून धार्मिक स्थळ व अल्पसंख्याकांवर हल्ला केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे यांना दोषी धरले होते. संभाजीराजे यांना छत्रपती शाहूराजेंचा उत्तुंग वारसा असताना त्यांनी असे पाऊल उचलायला नको होते. त्यांचे रक्त तपासून बघायला हवे. त्यांच्या आडून धर्मांध शक्तींनी डाव साधला. संभाजीराजेंच्या वागणे मलाच काय त्यांच्या वडिलांना देखील पटले नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली होती.

संभाजीराजेंचे रक्त तपासून बघायला हवे, या आव्हाड यांच्या टीकेवर स्वराज्य संघटना आक्रमक झाली होती. त्यांनी लवकरात लवकर संभाजीराजेंची माफी मागावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली होती. गुरुवारी दुपारीही पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांनी छत्रपती संभाजीराजेंना लक्ष्य केले.