जाळपोळ,गावबंदी, १४ सभांमधील शिव्या दिल्यावर आम्ही काय करावे…

0
188

मुंबई, दि. २० (पीसीबी) – कुठल्याही दोन समाजांमध्ये वितुष्ट यावं असं मला मुळीच वाटत नाही. आम्ही यासाठी काहीही केलेलं नाही. त्यांच्या १४ सभा झाल्यावर मी एक सभा घेतली आहे. मात्र जाळपोळ वगैरे करत नाही. महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे हे आम्हालाही कळतं मात्र जे महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करत आहेत त्यांचे कान धरा. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत की आमच्याकडून तेढ निर्माण केली जाते आहे त्यांना मी विचारतो आहे की आम्ही कुणाच्या घरासमोर टायर जाळले? कुठली हिंसा आम्ही केली ते सांगा? आम्हाला पेटवापेटवी नको आहे, जी आमची भूमिका आहे ती आम्ही मांडतो आहोत असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मात्र ज्यांनी कायदा हातात घेतला आहे त्यांना ते आधी लागू आहे असंही छगन भुजबळ म्हणाले.

मनोज जरांगेचं स्वागत आहे नाशिकमध्ये
मनोज जरांगेंना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं नाशिकमध्ये आम्ही स्वागत करतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. १४ सभा घेऊन आमच्या विरोधात कोण उभं राहिलं? आम्हाला शिव्या कुणी दिल्या? तेव्हा कुणाला वाटलं नाही का की दोन समाजात तेढ निर्माण होते आहे? आधी त्यावर बोला मग छगन भुजबळवर बोला माझी ऐकायची तयारी आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या गोष्टीला आमचा विरोध आहे. त्यावर अनेकांनी पाठिंबा दिला आहे. मागच्या दोन महिन्यात जरांगेंनी १४ सभा झाल्या. त्यात माझ्यावर वाट्टेल तसं बोललं गेलं. वाट्टेल ते बोलले तरीही मी शांत होतो. बीडमध्ये आमदारांची घरं जाळली गेली, हॉटेल्स जाळली गेली. पेट्रोल बॉम्ब वगैरे फेकले गेले. त्या सगळ्यावर भाष्य करणं मला योग्य वाटलं. मी मनोज जरांगेंना विरोध केला नव्हता, त्यांच्या आंदोलनालाही विरोध केला नव्हता. मग छगन भुजबळांचं नाव का घेतलं? जाळपोळ झाल्यानंतर मी शांत बसलो नाही. त्यामुळे माझा विरोध मी माझ्या पद्धतीने केला असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.