जगातील सर्वात मोठे रॉकेट उड्डाण करताच फुटले; तरीही एलन मस्क आनंदले!

153

वॉशिंग्टन, दि. २१ (पीसीबी) : अब्जाधीश एलन मस्क यांच्या पाठीमागे लागलेला मंगळ काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. ट्विटरमध्ये पुरते नुकसान झाल्यावर आता त्यांची महत्वाकांक्षी कंपनी स्पेसएक्सचे अवकाशात झेपावलेले जगातील सर्वात मोठे रॉकेट आकाशातच फुटले. यामुळे त्यांचे आकाशात साम्राज्य प्रस्थापित करण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरेच राहिले.

स्टारशिप रॉकेटचे आज अंतराळात प्रक्षेपण होणार होते. उड्डाणाच्या चार मिनिटांनी रॉकेट आकाशातच फुटले आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. अंतराळवीरांना चंद्र आणि मंगळावर पाठविण्यासाठी हे रॉकेट बनविण्यात आले होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे आठ वाजता तर भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता या रॉकेटने उड्डाण केले होते.

टेक्सासच्या बोका चिकायेथील स्टारबसवरून हे रॉकेड सोडण्य़ात आले होते. हे रॉकेट ३३ किमीची उंची गाठत नाही तोच त्याचा स्फोट झाला.

स्टारशिप हे जगातील सर्वात मोठे रॉकेट आहे. त्याची उंची 394 फूट आहे. व्यास 29.5 फूट आहे. हे रॉकेट दोन भागात विभागले गेले आहे. वरच्या भागाला स्टारशिप म्हणतात. या भागात अंतराळवीर बसू शकतात. त्याची उंची 164 फूट आहे. त्यात 1200 टन इंधन भरले जाते. अवघ्या एका तासात पृथ्वीच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचण्याची या रॉकेटची क्षमता आहे.

दुसरा खालचा भाग हा 226 फूट उंच रॉकेटचा आहे. यामध्ये 3400 टन इंधन भरले जाते. हे ऱॉकेट पुन्हा वापरता येणारे आहे. ते स्टारशीपला योग्य उंचीवर नेऊन परत येणार होते. या रॉकेटमध्ये सध्या कोणताही उपग्रह किंवा अन्य उपकरणे नव्हती. आता हा स्फोट का झाला याची चौकशी केली जाणार आहे, यानंतरच पुढचे उड्डाण केले जाणार आहे.

या घटनेवर स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी आनंद व्यक्त केला आहे. स्पेसएक्स टीमचे या रोमांचक चाचणीसाठी अभिनंदन. पुढच्या काही महिन्यात लॉन्चसाठी खूप काही शिकायला मिळाले, असे त्यांनी म्हटले आहे.