जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

135

पिंपरी दि. २० (पीसीबी) – जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याने आज (सोमवारी) दुपारी पावणे चारच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कठोर निर्बंधांमुळे पंढरीची वारी आणि वैभवी पालखी सोहळ्यापासून दूर असलेल्या वारकऱ्यांमध्ये यंदा पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी अमाप उत्साह दिसून येत आहे.

तुकोबांच्या पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटेपासूनच देहूनगरीत उत्साही वातावरण होते. पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिरात महापूजा आणि इतर विधी झाले. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत पालखी सोहळा काल्याचे कीर्तन आणि इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आदी उपस्थित होते.

प्रस्थान झाल्यानंतर आज पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी राहणार आहे. तुकोबांची पालखी उद्या आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या खडतर कालखंडानंतर तुकाराम, तुकाराम असा अखंड घोष अन् टाळ- मृदंगाचा गजर करीत यंदा वैष्णवांनी प्रस्थान सोहळ्यात हरिभक्तिचे रंग भरले.  आज सकाळपासून पावसाची रिमझिम सुरु झाल्याने वारकरी आणखीनच सुखावले.