जखमी महिलेला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला महिलेच्या नातेवाईकांकडून मारहाण

0
72

भोसरी, दि. ३० (पीसीबी) : टेम्पोच्या डाव्या बाजूने अचानक आल्याने टेम्पोची धडक बसून दुचाकीस्वार महिला जखमी झाली. त्या महिलेला टेम्पो चालक उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात होता. त्यावेळी तिथे जखमी महिलेच्या नातेवाईकांनी टेम्पो चालकाला मारहाण करून टेम्पोची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि. 29) सकाळी सव्वा नऊ वाजता एमआयडीसी भोसरी येथे घडली.

शिवम रामसुमेर वर्मा (वय 20), कृष्णा अजय आल्हाट (वय 20), धनंजय अरुण काळे (वय 21, तिघे रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तानाजी कुशाभाऊ कुडाळे (वय 53, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कडाळे हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो घेऊन एमआयडीसी भोसरी येथून जात होते. दरम्यान डाव्या बाजूने एक महिला दुचाकीस्वार अचानक टेम्पो समोर आली. त्यामुळे टेम्पोची दुचाकीला धडक बसली. त्यात महिला जखमी झाली. फिर्यादी कडाळे हे जखमी महिलेला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये घेऊन जात होते. त्यावेळी जखमी महिलेच्या नातेवाईकांनी कडाळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारून जखमी केले. तसेच कडाळे यांच्या टेम्पोची काच फोडून आरोपी पळून गेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.