छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामातच भ्रष्टाचार

0
41

सखोल चौकशीची मारुती भापकर यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या १०० फुटी पुतळा व स्मारकातील गैरकारभार, भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाईची मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना त्याबाबतचे पत्र भापकर यांनी पाठविले.

आपल्या पत्रात भापकर म्हणतात, पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय ऑगस्ट २०२० घेण्यात आला. या कामाची निविदा काढण्यात आली. निविदा काढताना अटी शर्तींचा वापर करून धनेश्वर कंन्ट्रक्शन या ठेकेदाराला हे काम देण्यात आले. सुरुवातीला या कामासाठी निश्चित केलेल्या जागेत चौथरा बांधण्यासाठी १२ कोटी रु. रक्कमेची निविदा काढली होती. धनेश्वर कंन्ट्रक्शन या ठेकेदारालाच हे काम देण्यात आले. संबंधित ठेकेदाराला साडेपाच कोटी रुपये अदा करण्यात आले. मात्र, या जागेसंदर्भात काही संघटना व शिवप्रतिष्ठानचे संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी आक्षेप घेतल्यामुळे ही जागा बदलण्यात आली.
महापालिकेने नंतर मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील सेक्टर ५ आणि ८ मधील सुमारे साडेसहा एकर जागेवर या पुतळा स्मारकासाठी ६० कोटी रुपये खर्चाला मान्यता दिली. पुन्हा हे काम धनेश्वर कंन्ट्रक्शन याच ठेकेदाराला देण्यात आले. दुसऱ्या जागेत ४० फूट चौथ्याऱ्याच्या बांधकामासाठी १५ कोटी मान्य करून हे काम सद्या सुरू आहे.
धनेश्वर कंन्ट्रक्शन या ठेकेदाराने दिल्ली येथील प्रख्यात शिल्पकार राम सुतार (अनिल सुतार) यांच्याशी करारनामा करून छत्रपती संभाजी महाराजांची १०० फुटी मूर्ती बनवण्याचे काम दिले. या कामासाठी शिल्पकार अनिल सुतार यांना पुतळ्याचा एकूण खर्च ३२ कोटी रुपये ठरविण्यात आला. आत्तापर्यंत त्यांना २२ कोटी रुपये अदा केले आहेत. एकूण या प्रकल्पासाठी सुमारे ६० कोटी रुपये खर्च होणार असून त्यापैकी ४० कोटी रुपये खर्च झाले आहेत.


दरम्यान, मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याचे दुर्दैवी प्रकरण घडले. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला, अस्मितेला धक्का पोहोचला. या घटनेमुळे प्रत्येक मराठी माणसाच्या काळजावर वार झाल्याची वेदना आम्हाला सहन करावी लागली. या प्रकरणाबाबत महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या भावना अतिशय तीव्र असताना पिंपरी चिंचवड शहरातील मोशी या ठिकाणी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या १०० फुटी पुतळ्याचे काम दिल्लीत नोयडा येथील प्रसिद्ध शिल्पकार श्री राम सुतार यांच्या शिल्पशाळेत सुरू आहे. या पुतळ्याचे काम टप्प्याटप्प्याने करून त्या कामाचे वेगवेगळे दहा भाग दोन वर्षांपूर्वी मोशी येथील पुतळ्याच्या चौथाऱ्याच्या समोरील मोकळ्या जागेत ठेवण्यात आले. या पुतळ्याच्या महाराजांच्या पायाच्या (मोजडी) व इतर भागांना चिरा (तडे जाणे, भेगा पडणे) गेल्या आहेत. पुतळ्याचे वेगवेगळे भाग ज्या ठिकाणी ठेवले त्या ठिकाणी वाढलेले गवत, सांडपाणी आहे.


आयुक्तांचा खोटारडेपणा उघड –
प्रत्यक्ष जागेवर जाऊन चित्रीकरण व फोटो काढून काही वृत्तवाहिन्यांनी व सोशल मीडियाने हि बातमी प्रसिद्ध केली. त्यावर आयुक्त शेखर सिंह यांनी विजेच्या चपळाईने एक प्रेस नोट काढून व व्हिडिओ तयार करून प्रतिक्रिया देताना म्हणाले “ही बातमी खोटी असून मोशी येथे केवळ पुतळ्याच्या चौथर्‍याचे काम सुरू आहे. पुतळ्याचे काम गुडगाव दिल्ली येथील श्री. राम सुतार यांच्या कारखान्यात सुरू आहे. आज सोशल मीडिया मधून जे फोटो, व्हिडिओ दाखवले जात आहेत ते फोटो श्री.राम सुतार यांच्या कारखान्यातील फोटो आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे सपशेल खोटे विधान आयुक्त सिंह यांनी जाहीरपणे केले. त्यांच्या या खोट्या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.

७० लाखाचे काम ७ कोटीला, धनेश्वर कंपनीचा उद्योग-
सुरुवातीला या पुतळ्याच्या चौथ्याऱ्यासाठी निवडलेली चुकीची जागा या कामासाठी सुमारे ५.५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. या विषयावरून टीका टिपणी सुरू झाल्यामुळे त्यावर पांघरून घालण्यासाठी या जुन्या जागेतील चौथऱ्यावर छत्रपती संभाजी महाराजांची मामा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या २० फुटी उभारण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये आणखी रक्कमेची वाढ करून इतरही कामे करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी पुन्हा धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराचीच नियुक्त होण्याची शक्यता आहे. या पुतळ्या संबंधित धनेश्वर कंन्ट्रक्शन हा ठेकेदार भाजपाच्या नेत्यांच्या संबंधित असून हा ठेकेदार रिंग करणे, वाढीव खर्च मंजूर करून घेणे, राजकीय लोकांचे पाठबळ घेणे आदी गोष्टींबाबत बहुचर्चित आहे. याच ठेकेदाराने भोसरी येथील शितलबाग पादचारी पुलाचे काम ७० लाखात घेतले होते. हे काम पूर्ण होईपर्यंत साडेसात कोटी रुपये याला अदा करण्यात आले. बोगस एफ. डी. आर., रिंग करणे, राजकीय लोकांचे हस्तक्षेप करून कामे मिळवणे याबाबत धनेश्वर कंन्ट्रक्शन हातखंडा असलेल्या प्रसिद्ध ठेकेदार असताना त्यांना हे काम देण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील मुद्द्यांची सखोल चौकशी करण्यात यावी.

१) धनेश्वर कंट्रक्शन या कंपनीला पुतळा उभारण्याचा यापूर्वीचा अनुभव आहे काय?
२) मोशी येथील स्मारकाची जागा चुकीची आहे. हे या प्रकल्पाचे सल्लागार यांना समजले नाही काय? या ५.५०कोटी रु. नुकसानीस नक्की जबाबदार कोण?
३) छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आले की धनेश्वर कंट्रक्शन कंपनीला देण्यात आले?
४) राज्यातील व देशातील अन्य शहरातील अशाप्रकारे उभारण्यात आलेल्या पुतळा व स्मारकाच्या खर्च पडताळून पाहिला आहे किंवा कसे.
५) छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे दीड दोन वर्षांपूर्वी मोशी येथे आणलेल्या सुट्टे भाग (मोजडी) ब्रांझ या धातूची आहे तर त्याला तडे भेगा का पडल्या?
६) शंभर फुटी पुतळा उभारताना या पुतळ्याच्या या तडे गेलेल्या भागासाठी ब्रॉझ सी ९०३ कि एल टु बी पैकी कुठल्या धातूंचा वापर करण्यात आला.
७) या पुतळ्याच्या तडे गेलेल्या भागासाठी ब्रांच ८५% कॉपर, ५% टेन, ५% झिंक, ५% लेड याचा वापर काय प्रमाणात झाला.
८) या विषयाचा तंत्रशुद्ध अभ्यास करून तज्ञांचा सल्ला घेऊन१०० फुटी पुतळा गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व चिरस्थायी होण्यासाठी प्रशासनाने वरीलपैकी नेमकी कुठली प्रक्रियेचा अवलंब केला ?
९) शिल्पकार श्रीराम सुतार (अनिल सुतार) यांना आजपर्यंत किती रक्कम अदा केली. व काम पूर्ण होईपर्यंत आणखी किती रक्कम अदा करायचे आहे?
१०) या पुतळ्याची सुट्टे भाग दिल्लीहून वाहतूक करून मोशी पर्यंत आणताना तडे गेले असतील चिरा पडल्या असतील तर हे भाग मोशी या ठिकाणी आणल्यानंतर ते ताब्यात कोणी घेतले. मागील एक दीड वर्षापासून महापालिका अधिकाऱ्यांनी यासंदर्भात संबंधित मूर्तिकार अथवा ठेकेदार यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्या ही गंभीर बाब लक्षात आणून दिली किंवा कसे?
११) धनेश्वर कंन्ट्रक्शन या कंपनीचे राजकीय कोणकोणते नेते पार्टनर आहेत?
१२) धनेश्वर कंन्ट्रक्शन या कंपनीचा दहा वर्षांपूर्वी उलाढाल किती होता व आज किती आहे?
१३) धनेश्वर कंन्ट्रक्शन या कंपनीला मागील दहा वर्षात भोसरी विधानसभा व शहरातील विविध भागांमध्ये एकूण किती कामे दिली ? त्यांना आतापर्यंत किती रक्कम अदा केली?
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा भव्य दिव्य झालाच पाहिजे. मात्र हा पुतळा उभारताना मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या प्रमाणे दुर्घटनाग्रस्त होऊ नये. तसेच हा भव्य दिव्य पुतळा उत्कृष्ट, दर्जेदार, गुणवत्त व चिरस्थाई टिकाऊ होण्यासाठी वरील सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी प्रसिद्ध शिल्पकार, इंजिनीयर, इतिहासकार, तज्ञ अधिकारी कला संचालन विभाग यांच्यामार्फत वरील सर्व बाबींची तातडीने चौकशीची मागणी भापकर यांनी केली आहे.