चिखलीतील आगीत कामगार बालंबाल बचावले, मोठा अनर्थ टळला

0
204

चिखली, दि. १८ (पीसीबी) – कुदळवाडी येथील ॲल्युमिनियम पावडरचे गोदाम शनिवारी सायंकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाले. कामगार जीव वाचविण्यासाठी बाहेर पळाले. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला. दरम्यान, शहरात आणि विशेषतः चिखली कुदळवाडी येथील भंगार गोदामे, कारखाने परिसरातील आगीमुळे प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यने चिंतेचे वातावरण आहे.

या गोदामाच्या आसपास मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकने भरलेली गोदामे आहेत. त्यामुळे, खबरदारी घेत अग्निशमन दलाने जादा बंब बोलावून आग नियंत्रित ठेवल्यामुळे इतर गोदामे आगीच्या तडाख्यातून वाचली. अग्निशमन विभागाचे अधिकारी अनिल डिंबल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडी येथे भैरवनाथ नगरमधील महादेव मंदिर रस्त्यावर ॲल्युमिनियम आणि प्लास्टिक पावडर मिक्स करून त्याचे कव्हर बनविण्याचा कारखाना आहे. कव्हर बनवण्यासाठी चेंबरमध्ये पावडर टाकत असताना ॲल्युमिनियम पावडरने अचानक पेट घेतला.

प्लास्टिक मिक्स ॲल्युमिनियम पावडर ज्वलनशील असल्याने लगेचच गोदामामध्ये पसरलेली पावडर आगीने वेगात वेढली. दरम्यान, त्याबाबत माजी नगरसेवक दिनेश यादव यांनी अग्निशामन दलाला हा प्रकार कळविला. त्यानंतर, अवघ्या दहा मिनिटांच्या आत अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ॲल्युमिनियम पावडरवर पाणी मारल्यामुळे ते अधिकच पेट घेऊ लागले.त्यामुळे, अग्निशामन दलाच्या जवानांनी आजूबाजूच्या गोदामांवर पाणी मारून आगीची तीव्रता कमी केली. इतरत्र, आग पसरली न गेल्याने लगेचच आग आटोक्यात आली आणि नुकसानही टाळता आले. अग्निशमन दलाच्या एकूण सात बंबांनी आग विझविली

चिखली कुदळवाडी परिसरात भंगार मालाची शेकडो गोदामे तसेच छोटे माठे व्यवसाय आहेत. पुठ्ठा, लाकडी खोके, प्लॅस्टिक गोनी, केमिकल ड्रम्स, रसायनयुक्त कचरा, वाहनांचे सुटे भाग, प्लायवूड फर्निचर असे हजारावर व्यवसाय आहेत. कुठलिही परवनागी नाही, अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला नाही तसेच सर्व कारखाने आणि गोदामे अवैध असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. महापालिका प्रशासनातील अधिकारी हप्ते घेऊन तिकडे दुर्लक्ष करत असल्याने बेफिकिरी वाढली आहे.

आगीच्या घटनांत जिवीत हानीच्या घटना शहरात लक्षवेधी आहेत. पुर्णानगर येथील हार्डवेअर दुकानात पोटमाळ्यावर झोपलेले चारजणांचे कुटुंब आगीत होरपळून संपले. त्यानंतर शहरातील दुकानांत कुठे कुठे बेकायदी पोटमाळे आहेत त्यांचा पंचनामा करून कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. बहुसंख्य व्यापार संकुलांत बेकायदा पोटमाळे काढून तिथेच बेकायदेशीरपणे लोक राहत असल्याचेे निदर्शनास आले. किमान आगीच्या घटनेनंतर प्रशासन जागे होईल आणि अशा दुकान मालांकवर कारवाई करेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात प्रशानाने फक्त सर्वेक्षण केले आणि तोंड बंद ठेवले.

तळवडे रुपीनगर येथील रेडझोनमध्ये असलेल्या बेकायदा फटाक्याची दारू तसेच मेनबत्ती बनविण्याच्या कारखान्यात आग लागली होती. १४ महिलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला पाच लाखाची भरपाई देऊन प्रशासन गप्प बसले. वाल्हेकरवाडी येथील बेकायदा दुकानात आग लागली आणि पोटमाळ्यावर झोपलेले दोन सख्खे भाऊ भाजून मृत्यू पावले. गुन्हा दाखल करून प्रशासन शांत बसले मात्र, परिसरातील बेकायदा गोदामे, दुकानांची तपासणी केली नाही आणि कारवाईसुध्दा नाही. शहरातील शेकडो हॉटेल्स आणि त्यांचे किचनसुध्दा इमारतींच्या पार्कींग प्लेसमध्ये म्हणजेच तळमजल्यावर आहेत.