चहापान, बावनकुळे आणि पत्रकारांची बेईज्जत :थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
417

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लीप तुफान व्हायरल झाली आहे. तुमच्या बूथवरील पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा आणि चहा म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला कळलच असेल असा वादग्रस्त सल्ला चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचं त्यामध्ये ऐकू येत आहे. अहमदनगर येथे बावनकुळेंच्या उपस्थितीत महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करत होते. तेव्हा बावनकुळे यांनी तुमच्या बुथवरील चार पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा, ज्यामुळे आपल्या विरोधात बातम्या छापून येणार नाहीत अशा आशयाचे विधान बावनकुळे यांनी केलं. एबीपी माझाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

नेमके काय म्हणाले बावनकुळे, एकदा कान देऊन ऐका –
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या ऑडिओ क्लीपमध्ये तुम्ही ज्या चार बूथवर काम कराल त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? छोटे-छोटे पोर्टलवाले गावात फिरतात. आपण आपल्या बुथवर एवढं चांगलं काम करतो, पण एखादे असे टाकतात की जसं गावात बॉम्बच फुटला. तुमच्या बुथवर चार दोन जे पत्रकार आहेत, त्यात कोण कोण आहेत त्यांची यादी बनवावी. हे चार-दोनच असतील. एक दोन पोर्टलवाले असतील, एक-दोन प्रींट मीडियावाले असतील, एकदोन इलेक्ट्रॉनिक मीडियावाले असतील. या पाच-सहा जणांना महिन्यात एकदा चहा प्यायला बोलवा, त्यांनी महाविजय २०२४ मध्ये फक्त आपल्या विरोधात काही लिहू नये. त्यांना चहा प्यायला बोलवा, म्हणजे काय ते तुम्हाला समजलं. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. कोणतीही बातमी त्या चार बूथवरती आपल्या फेवरमध्ये आली पाहिजे, आपल्या विरोधात नाही. त्या चार बूथवर एकही बातमी आपल्या विरोधात आली नाही पाहिजे. आपल्यासाठी पॉझिटीव्ह आली पाहिजे निगेटिव्ह नाही, असेही बावनकुळे या कथित व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये म्हणताना ऐकू येत आहे.

बावनकुळेंचे स्पष्टीकरण …
ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या ऑडोओचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. मी म्हणाले की चुकीच्या बातम्या येऊ नयेत. एखादी घटनाच घडली नाही त्या घटनेच्या बातम्या येतात. छोटे-छोटे पोर्टल बातम्या चालवतात, कारण त्यांच्याकडे पूर्ण माहिती नसते. आपलंही मत आलं पाहिजे. पत्रकारांना बातमी देण्याचा अधिकार आहे, पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण आमचं मत ऐकलं पाहिजे. मत जाणार नाही तर ती बातमी एकतर्फी असेल असं मी म्हणालो, त्यामुळे त्यात काही गैर नाही असेही बावनकुळे म्हणाले आहेत.

भाजपने मीडिया कशा पध्दतीने ताब्यात ठेवला ही त्याचीच एक झलक. गेल्या दहा वर्षांत मीडियाची पत इतकी खालावली की आता जाहीर मेळाव्यात सत्ताधारी पक्षाचे राज्याचे अध्यक्ष पत्रकारांची नाचक्की होईल, असे बोलतात. लोकशाहिचे तीन स्तंभ पोखरलेत आता चौथ्या स्तंभाची किंमत चहापानावर आली. खरे तर, राज्यकर्त्यांनी पत्रकारितेची पार बेअब्रू केली. शेकडो किस्से सांगता येतील. अदानी-अंबानी यांच्या माध्यमातून ९० टक्के मीडिया खिशात ठेवला. पत्रकारांची अवस्था पिंजऱ्यातील पोपटासारखी झाली. मालक बोलेल तेच तोसुध्दा पुढे चालवतो. मीडिया हाऊसची अक्षरशः सब्जी मंडी झाली. देशाचे पंतप्रधान सलग साडेनऊ वर्षे सत्तेत आहेत, पण एकदाही मीडियाला सामोरे जावे असे त्यांना वाटले नाही. संसदीय लोकशाहिचा खेळ झालाय. खासदार-आमदारांची खरेदी-विक्री होते. सुप्रिम कोर्टाला मोदी सरकार भिक घालत नाही. प्रशासनालाही मनासारखे वाकवते आणि आता माध्यमे खिसगणतीतही नाहीत. कोणाचाही दबाव नाही, निव्वळ मनमानी. अशा परिस्थितीत बावनकुळे यांनी पत्रकारांची निर्भत्सना केली त्यात त्यांची काहीच चूक नाही. कारण भाजपचे आता अगदी मोदींपासून बावनकुळेंपर्यंत काँग्रेसीकरण झालेय. पत्रकार संघटना किंवा एकही मीडिया हाऊस त्यावर भाष्य कऱणार नाही. किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडीओ प्रकऱणात तीनच दिवसांपूर्वी लोकशाही चॅनलवर ७२ तासांची बंदी आणली होती. न्यायालयाने हस्तक्षेप केल्यावर ती उठविण्यात आली. भाजपची ही कार्यपध्दती आता जनतेलाही माहित झाली, त्यामुळेच पेपरात छापून आलेली बातमी किंवा कुठल्याही चॅनलवरची बातमी लोक लगेचच खरी मानायला तयार नसतात. माध्यमांतील चर्चा एकारलेल्या असतात म्हणून भाजप विरोधकांच्या इंडिया आघाडीनेही १४ न्यूज अँकरवर बहिष्काराचा इशारा दिला. एकूणच काय तर बावनकुळेंनी पत्रकारांच्या चहापानावर भाष्य केल्याने माध्यमांची किंमत फक्त चायबिस्कूट पूरती झाली हेही तितकेच खरे. बावनकुळे बोलले त्यात पत्रकारांची बेईज्जत झाली, पण वास्तव नाकारता येत नाही. निवडणूक काळातील पेड, पॅकेजने पत्रकारिता उध्वस्त केली. आता काही मिडीया हाऊस सरकराच्या कृपेने ठेकेदारी करू लागलेत. देशातील १०० स्मार्ट सिटीमधील बहुसंख्य बनावट सल्लागार कंपन्या या माध्यमाच्या सिस्टर कन्सर्न आहेत. कोळसा घोटाळा एक नजरेत भरला, पण त्याहीपेक्षा मोठ मोठे घोटाळ्यात आता मीडियी हाऊसेसची नावे समोर येत आहेत. मालक कंपनींचा तोबरा भरायचा आणि एकही विरोधातील बातमी छापून येणार नाही याचा चोख बंदोबस्त करायचा हा भाजपचा खाक्या. गेल्या दहा वर्षांत कोण किती लाभार्थी झाले याचा हिशेब मांडला तर डोळे पांढरे होतील. चहापान पत्रकार हे अत्यंत किरकोळ प्रकरण आहे. चौथा स्तंभ हा आता लोकशहिच्या तिरडिचा चौथा बांबू झाला, असे पिंपरी चिंचवड येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जाहीर भाषणात म्हणाले होते. त्यापुढे बावनकुळेंचे विधान खूप किरकोळ आहे. भाजपने पत्रकारांना चहापानावर बोळवले आणि इंडिया आघाडीने थेट बहिष्काराचे हत्यारच उपसले. दोन्ही बाजुंनी नाचक्की, बदनामी पत्रकारांची झाली. मलाई खाणारे मालक नामानिराळे राहिले. आता वारांगना परवडल्या अशी पत्रकारांची अवस्था झालीय. बावनकुळेंच्या निमित्ताने थोडे अंतरंगात झाकून पाहण्याची गरज आहे. अन्यथा आज पत्रकारिता तिरडीवर गेली आता फक्त अग्नीडाग देण्याची कमी आहे.