चंदिगढमध्ये भाजप महापौरांचा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी आधीच राजीनामा

0
76

चंदिगढ, दि. १९ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून चंदीगडमध्ये हायव्होल्टेज घडामोडी घडत आहेत. भाजपचे नवनियुक्त महापौर मनोज सोनकर यांनी रविवारी रात्री उशिरा राजीनामा दिला आहे. 30 जानेवारीला त्यांची महापौरपदी निवड झाली होती. या निवडणुकीनंतर मोठा गोंधळ झाला होता. निवडणुकीदरम्यान मतपत्रिकांमध्ये गडबड झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं.

आज या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, त्या आधीच नवनियुक्त महापौर मनोज सोनकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे चंदीगडची महापौरपदाची निवडणूक नवीन वळण घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

भाजप महापौर मनोज सोनकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच त्यांनी राजीनामा का दिला ? याबाबत देखील सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तर याच दरम्यान आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ‘आप’च्या नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे पुन्हा निवडणूक झालीच तर भाजपकडे बहुमतचा आकडा आणखी वाढेल, त्यामुळे पुन्हा भाजपचा महापौर निवडून येऊ शकतो.

सुप्रीम कोर्टाचे जोरदार ताशेरे
चंदीगड महापौर निवडणुकीत मतपत्रिकांमध्ये गडबड झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या निवडणुकीदरम्यान निवडणुकीतील एका पीठासीन अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये अधिकारी मतांची खाडाखोड करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. या प्रकरणावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने जोरदार ताशेरे ओढले होते. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 फेब्रुवारीला ठेवण्यात आली होती.