घाण पाण्याचा जाब विचारल्याने दोघांवर खुनी हल्ला

0
369

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – घरातून येणाऱ्या घाण पाण्याबाबत जाब विचारल्याने एका व्यक्तीने दोघांवर सत्तूरने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री पावणे दहा वाजता गणपत लांडगे चाळ, सदगुरुनगर, भोसरी येथे घडली.

चित्तरंजन शरद बेहरा (वय २५, रा. गणपत लांडगे चाळ, सदगुरुनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बेहरा यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बेहरा त्यांच्या घरातून बाहेर येत असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घरातून लाल रंगाचे पाणी येत होते. त्याबाबत त्यांनी शेजारच्या व्यक्तीला जाब विचारला. त्यावरून त्या व्यक्तीने फिर्यादीस तू माझी तक्रार घरमालकाकडे करतो का, असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने सत्तूरने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. फिर्यादी यांना वाचविण्यासाठी त्यांचा भाऊ आला असता आरोपीने फिर्यादीच्या भावाला देखील सत्तूरने मारून त्यांच्यावर खुनी हल्ला केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.