घरात घुसून महाविद्यालयीन तरुणीचा गळा चिरला

0
511

धुळे, दि. २३ (पीसीबी) – धुळे शहरातील नकाने रोड परिसरातील बालाजी नगर येथे एका महाविद्यालयीन तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता कल्याण पाटील असं हत्या झालेल्या २१ वर्षाय तरुणीचं नाव आहे. ती धुळे शहरातील नकाने रोड येथील बालाजी नगर येथे वास्तव्यास होती. ती महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बुधवारी सायंकाळी पीडित तरुणीचे आई-वडील आणि भाऊ घरगुती कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी तरुणी घरी एकटीच होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने घरात शिरून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. तसेच पोटावरही खोलवर वार करण्यात आला. या हल्ल्यात रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला.

या घटनेची अधिक माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी सांगितलं की, बुधवारी सायंकाळी आम्हाला नकाने रस्त्यावरील विघ्नहर्ता रुग्णालयाच्या मागे निकिता कल्याण पाटील या २१ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी संबंधित तरुणीचा तीक्ष्ण हत्याराने गळा कापल्याचं दिसत आहे. तसेच तरुणीच्या पोटातही खोलवर वार करण्यात आला आहे. यामुळे रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही तीन पथकं तयार केली आहेत. काही संशयितांची नावं आम्हाला समजली आहेत. त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या टीम कडून पुरावे गोळा करण्यात आले आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली आहे.