घरात केली गुटख्याची साठवणूक; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
206

चिखली, दि.१५ (पीसीबी) -प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्या प्रकरणी एका व्यक्तीला चिखली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन लाख ३७ हजार ३०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १४) सायंकाळी कुदळवाडी येथे करण्यात आली.

अब्दुलमजीद मुबारक अली कपूर (वय ३४, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश खेडकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कपूर याने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला विक्री करण्यासाठी त्याच्या घरात साठवून ठेवला. याबाबत चिखली पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी दोन लाख ३७ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.