“गोपीचंद पडळकर यांच्या मिरवणुकीत गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फलक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तीव्र संताप”

0
25
दि . १६ ( पीसीबी )  – भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकमधील मिरवणुकीत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकविण्यात आले. गोपीचंद पडळकर बुधवारी सभेत बोलत असताना एका मुलगा लॉरेन्स बिश्नोईचा फोटो घेऊन उभा होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
नाशिकमध्ये भाजपच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने हिंदू विराट सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर बोलत असताना त्यांच्यासमोर काही मुलांच्या हातात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो होता. पडळकरांच्या सभेतील बिश्नोईच्या फोटोवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यांनी लगोलग पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही. ज्यांनी फलक झळकवले त्यांच्यावर कारवाई होईलच, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
मला स्वत: गोपीचंद पडळकर यांनी याबाबत सांगितले. त्यावर मी त्यांना सविस्तर प्रकार पोलिसांना सांगा, असे बजावले आहे. तसेच कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांचे महिमामंडण होणे कदापि मान्य असणार नाही. आणि ज्यांनी लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकावले असतील त्यांच्यावर कारवाई होईलच, असेही फडणवीस यांनी सांगितले.