गेटमधून बाहेर काढले म्हणून दोन सुरक्षा रक्षकांवर कोयत्याने वार

40

चऱ्होली, दि. २२ (पीसीबी) – कामावरून काढून टाकलेल्या सुरक्षा रक्षकाला सोसायटीमधून बाहेर काढले. त्या रागातून त्याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून सहकारी दोन सुरक्षा रक्षकांवर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि.20) मध्यरात्री प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

परमेश्वर शिवदासराव भोसीकर (वय 30, रा. लोहगाव), शुभम नागोराव कदम (वय 24) अशी जखमी सुरक्षा रक्षकांची नावे आहेत. याप्रकरणी परमेश्वर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश शर्मा (वय 24) व त्याचे दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश शर्मा आणि फिर्यादी हे एकाच सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करतात. आकाश शर्मा याला दारूचे व्यसन असल्याने त्याला कामावरून काढून टाकले आहे. फिर्यादी व त्यांचे सहकारी शुभम हे प्राईड वर्ल्ड सिटी या सोसायटीमध्ये काम करत होते. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सोसायटीचे गेट बंद असताना आरोपी आकाश हा त्याची दुचाकी घेऊन गेट उघडून आत आला. फिर्यादीस हे समजल्याने त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी आकाशला अडवले आणि गेट बाहेर काढले. त्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून फिर्यादी परमेश्वर आणि त्यांचा सहकारी सुरक्षा रक्षक शुभम यांच्यावर कोयत्याने वार केले. या खुनी हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.