गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडून २० जणांचा मृत्यू

0
234

गुजरात,दि.२७(पीसीबी) – देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कालपासून अधून मधून रिमझिम पाऊस पडतोय. दुसऱ्या बाजूला गुजरात राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. रविवारी सकाळपासून चालू असलेल्या या पावसामुळे अनेक शहरं आणि जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या याहून अधिक असू शकते असं म्हटलं जात आहे. या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीदेखील झाली आहे. तसेच ४० हून अधिक पाळीव जनावरं (गायी-म्हशी) दगावली आहेत.

गुजरातच्या अमरेली, सुरेंद्रनगर, मेहसाना, बोताड, पंचमहाल, खेडा, साबरकांठा, सुरत आणि अहमदाबाद या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसासह ताशी ५ किमी वेगाने वारा वाहत असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. गुजरातमधील काही भागात गारपिटीचे दृश्यही पाहायला मिळत आहे. हिवाळ्यातही पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. सौराष्ट्रातील जुनागढ, कच्छ, गीर-सोमनाथ, उना, गोडल, जेतपूरसह अनेक भाग प्रभावित झाले आहेत. मोरबीमध्ये गारांसह पाऊस झाला.

अवकाळी पाऊस झाल्यास पिकांवर रोग पडून मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, मूग या पिकांची लागवड केली आहे. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरीही संभ्रमात पडले आहेत. वादळी वाऱ्यामुळे चिकू, ज्वारी, कापूस या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. दुसरीकडे, मोरबीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिरॅमिक कारखान्याचे छत उडून गेले. राजकोटमधील कुवाडवा रोडच्या मलियासनजवळ रस्त्यावर बर्फ पसरून रस्ता झाकला गेला आहे.

दरम्यान महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय. चंद्रपूर जिल्ह्यात सकाळी सात वाजेपासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे थंडीचा गारवा असताना अवकाळी पावसामुळे वातावरण आणखी थंड झालं आहे. शेतात रब्बी पिके उभी आहेत. अशात पाऊस सुरू झाल्याने शेतीचे मोठे नुकसान होणार आहे.

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि ठाणे ग्रामीण भागात रविवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला, तर शहापूर तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ठाणे जिल्ह्यात रविवारी पहाटे आणि सायंकाळी पाऊस कोसळला. ठाणे शहरात सायंकाळी आकाश काळवंडले आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळू लागला. त्यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. रविवार असल्याने शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी होती. तरीही पावसामुळे वाहनांचा वेग मंदावला होता.