गावगुंडाकडून महिलेचा विनयभंग, रिक्षाचीही तोडफोड

0
44

हिंजवडी, दि. ०१ (पीसीबी) : एका गावगुंडाने शिवीगाळ करीत महिलेचा विनयभंग केला. तसेच मोबाइल आपटून रिक्षाचीही तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास मारूंजी येथे घडली.

दिगंबर सुभाष बुचडे (पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 30 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 30) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बुचडे हा रविवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराबाहेर शिवीगाळ करीत होता. त्यामुळे फिर्यादी, त्यांचे पती, दीर, वहिनी आणि भाऊ हे घराबाहेर आले. त्यावेळी आरोपी बुचडे यांने फिर्यादी महिलेला सर्वांसमोर अश्लिल शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या साडीचा पदरही ओढला. फिर्यादी यांना सोडविण्यासाठी त्यांचे कुटुंब आले असता आरोपीने त्यांना हाताने मारहाण केली. तसेच रस्त्यावरील दगड उचलून फिर्यादी यांना मारण्यासाठी आला. या घटनेचे चित्रीकरण मोबाइलमधून फिर्यादी यांचा भाऊ करीत होता. त्याचा मोबाइल आरोपी बुचडे याने घेऊन जमिनीवर आपटून फोडून टाकला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या रिक्षाचीही तोडफोड केली. तू येथे कसा राहतो तेच पाहतो, अशी धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.