गद्दारांना गाढण्यासाठी सांगवी मध्ये धडाडणार महाविकास आघाडीच्या तोफा

0
73

८ मे रोजी महाविकास आघाडीची महासभा

उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार अशा दोन दिगजांच्या होणाऱ्या घणाघातामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता

    दि ६ मे (पीसीबी )- एका जगविख्यात विचारवंताने एक अजरामर वाक्य लिहून ठेवले आहे."तुम्ही एखाद्याची मालमत्ता चोरू शकता पण त्याचे मालमत्ता कमावण्याचे हुनर तुम्हाला कदापिही चोरता येत नाही". हे वाक्य महायुतीमधील महाचोरांना चपखल बसते. असाच घणाघात ८ मे रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर ऐकायला मिळणार आहे. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा आयोजित करण्यात आली आहे.
    शिवसेना पक्ष चोरून,बाळासाहेब ठाकरेंचे नाव चोरून आणि पारंपारिक निशाणीवर दावा सांगून गद्दारी केलेल्यांना त्यांची योग्य जागा दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने संजोग वाघेरे पाटील यांच्या स्वरूपामध्ये एक प्रामाणिक, सजग आणि जनमानसातील प्रश्नांची जाण असणारे उमदे उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक ८ मे रोजी सायंकाळी सहा वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सी पी आय (एम),आर पी आय (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया असे महाविकास आघाडी मधील घटक पक्षांचे नेते या महासभेमध्ये आपले विचार मांडणार आहेत. 
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य आमदार जयंत भाई पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, आर पी आय ( ए) चे दीपक भाऊ निकाळजे या वक्त्यांचे  विचारवैभव उपस्थित श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. 
     उद्धव ठाकरे यांना जनमानसातून मिळणारा पाठिंबा राज्यभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. वयाची ८० उलटून देखील असाध्य व्याधींना नामोहरम करत संघर्ष योद्धा आधारवड शरद पवार साहेब अक्षरशः पायाला भिंगरी लावून महाविकास आघाडीचा प्रचार करत आहेत. भाई जयंत पाटील यांचे आक्रमक भाषण नेहमीच विरोधकांच्या उरात धडकी भरवत असते. पृथ्वीराज चव्हाण यांचे अनुभवी प्रगल्भ आणि मुद्देसूद भाषणाला विरोधकांच्या कडून एक टक्का देखील प्रत्युत्तर होत नाही. संजय सिंह आणि दीपक भाऊ निकाळजे यांची सडेतोड भाषणे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकवत आहे. त्यामुळे नागरिकांना देखील आठ मे रोजी महाविकास आघाडीच्या धडाडणाऱ्या तोफांचे आवाज ऐकण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने तमाम नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.