गणेशोत्सवाच्या विसर्जन ठिकाणांची केली पाहणी

0
54

पिंपरी, दि. ०३ (पीसीबी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गातील रस्ते व्यवस्थित करणे तसेच विसर्जनासाठी पुरेसे कर्मचारी आणि यंत्रणा कार्यान्वित ठेवणे आणि सर्व घाटांवर निर्माल्य कुंडाची व्यवस्था करणे, कृत्रिम विसर्जन हौदांची तातडीने स्वच्छता आणि डागडुजी करणे, आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे अशा सुचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी अधिका-यांना दिल्या.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी आज भोसरी, आळंदी रस्ता, मोशी,चिखली येथील रस्त्यांची तसेच गावजत्रा मैदान, मोशी घाट आणि मोशी खाणीजवळील विसर्जन ठिकाणांची पाहणी केली आणि महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या सोईसुविधांबाबत आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांचेसमवेत शहर अभियंता मकरंद निकम,उप आयुक्त मनोज लोणकर,अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टुवार, शिवराज वाडकर, उप अभियंता नरेश जाधव, सुशीलकुमार लवटे, शैलेश चव्हाण, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,प्रशासन अधिकारी नाना मोरे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

याभेटी दरम्यान श्रीगणेशाची मिरवणूक तसेच विसर्जन मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करणे, शहरातील विसर्जन घाटांवरील निर्माल्यकुंडांची ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी फलक लावावेत, विसर्जना दरम्यान जीवरक्षकांची नेमणूक करावी, अत्यावश्यक ठिकाणी ॲम्ब्युलन्स व्यवस्था करणे, अग्निशमन तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, विसर्जन घाटांवर विद्युत विषयक कामे करणे अशा सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.