गणपती मंदिरात चोरी दानपेटी फोडली गणपतीच्या हातातील चांदीचा मोदक पळवला

35

तळेगाव, दि.१२(पीसीबी) -मावळ तालुक्यातील ठाकरवस्ती येथील गणपती मंदिरात चोरी झाली. मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम तसेच गणपतीच्या हातातील चांदीचा मोदक चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १०) पहाटे उघडकीस आली.

संजय वासुदेव ओक (वय ६०, रा. ठाकरवस्ती, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरवस्ती येथे असलेल्या गणपती मंदिरात गुरुवारी रात्री साडेदहा ते शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या कालावधीत चोरी झाली. चोरटयांनी मंदिरातील लाकडी दान पेटीतील २५ हजार रुपये रोख रक्कम, फिर्यादी ओक यांच्या कपड्यात ठेवलेले १२ हजार ७०० रुपये रोख रक्कम, १० हजारांचा चांदीचा मोदक आणि फिर्यादी यांचा पाच हजारांचा मोबाईल फोन असा एकूण ५२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.