खराडीमधील ‘खालसा जीम’मध्ये मुलगा बुडाला

0
100

खराडी येथील ‘खालसा जीम’ मधील जलतरण तलावात एका १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोहता येत असतानाही दुर्घटना घडल्याने पोलिसांचा तपास सुरू
खराडी येथील ‘खालसा जीम’ मधील जलतरण तलावात एका १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. प्रतीक तांबोळी (वय १३, रा. गणेशनगर, चंदननगर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

प्रतीक हा मंगळवारी दुपारी खराडीतील ‘खालसा जीम’मध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत होते. दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला. त्यावेळी जीवरक्षक देखील जलतरण तलावावर उपस्थित होते. पोहताना तो बुडायला लागला. मात्र, ही गोष्ट कोणाच्याही लवकर लक्षात आली नाही. त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून देण्यात आला. ही घटना नेमकी कशी घडली, त्यावेळी कोणकोण उपस्थित होते? जीवरक्षक नेमके काय करीत होते? तो नेमका किती फूट पाण्यात पोहत होता, याची सर्व माहिती घेतली जात असून तपास केला जात असल्याचे वरिष्ठ निरीक्षक मनीषा पाटील यांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी वारजे येथील एका आलिशान सोसायटीच्या जलतरण तलावात बुडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच दुसरी घटना घडल्याने जलतरण तलावांवरील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.