क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक देशवासीयांसाठी प्रेरणास्थळ – राज्यपाल रमेश बैस

65

चिंचवड,दि.१३(पीसीबी) – क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे असून देशासाठी भुषणास्पद आहे. क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुनर्निमाण करुन स्मारक देशासाठी प्रेरणास्थळ बनविले आहे. स्मारकामुळे नव्या पिढीला चापेकरांचे कार्य, इतिहास माहिती होईल, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् चे भटक्या-विमुक्तांच्या सशक्तीकरणासाठीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरद्गारही त्यांनी काढले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवाचा सांगता समारंभ राज्यपाल बैस यांच्या उपस्थित मंगळवारी पार पडला. समितीचे अध्यक्ष, पद्मश्री गिरीश प्रभुणे, विश्वस्त मिलींद देशपांडे, कार्यवाह ॲड सतिश गोरडे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अश्विनी जगताप, महापालिका आयुक्त शेखर सिंह, सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, कोषाध्यक्ष रवी नामदे, निता मोहिते, शकुंतला बन्सल, अशोक पारखी, नितीन बारणे, सुहास पोफळे, आसाराम कसबे, राहुल बनगोंडे आदी उपस्थित होते. राज्यपाल बैस यांनी चापेकर वाड्याला भेट दिली. वाड्याची माहिती घेतली. त्यानंतर पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् ला भेट दिली. गुरुकुलममधील विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला.

राज्यपाल बैस म्हणाले, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मध्ये पारधी समाजीतल ३५० विद्यार्थ्यांची देखभाल केली जात आहे. शिक्षण, महिला सशक्तीकरण, भटक्या-विमुक्त जातीच्या विकासासाठी समिती काम करत आहे. पारधी, वडार, कैकाडी, गोसावी, गोंधळी, डोंबरीसह विविध जातीच्या लोकांच्या सशक्तीकरणासाठी कार्य केले जात आहे. आदिवासी समाजाचे लोक इंग्रजांना आव्हान देणारे पहिले स्वातंत्र्य सेनानी आहेत. आदिवासी, भटक्या जाती जमातीतील लोकांना शिक्षित करण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रधान करण्याची गरज आहे. एकीकडे चांद्रयान मिशन यशस्वीपणे पूर्ण केले आहे. सौर मिशनही लाँच केले आहे. दुसरीकडे कमकुवत समाजातील लोक अन्यायाने पिडीत आहेत. सन्मानासाठी झुंजत आहेत.

पुनरुत्थान गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना संगणक, मूर्ती कला, कौशल्यावर आधारित शिक्षण दिले जात आहे. कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी जगातील विविध देश भारताकडे आक्षेने बघत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना रोजगापूरक शिक्षण, सर्वोतम, भाषा कौशल्य दिले पाहिजे. युवकांना उद्योजक बनण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. तरच युवक आत्मनिर्भर बनतील. त्यांच्या कुटुबियांचा जीवनस्तर उंचावेल, असेही राज्यपाल बैस म्हणाले.

राजभवनाचे दरवाजे खुले
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्य वाखणण्याजोगे आहे. समितीसाठी राजभवनाचे दरवाजे सातत्याने खुले आहेत. समितीसाठी कोणतीही मदत करु शकल्यास मला सर्वाधिक आनंद होईल, असेही राज्यपाल बैस म्हणाले.

प्रास्तविक करताना गिरीश प्रभुणे म्हणाले, पारधी समाजातील मुले शिक्षण घेत आहेत. मुलांना वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकासाचे कौशल्यावर आधारित शिक्षण दिले जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिंगबर ढोकले यांनी केले. तर, ॲड सतिश गोरडे यांनी आभार मानले.