कोयत्याच्या धाकाने एकास लुटले; दोघांना अटक

0
611

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्याची चेन, बाळी काढून घेतली. त्यानंतर फोन पे वरून तीन हजार 900 रुपये ट्रान्सफर करून घेत मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी पावर हाउस कॉर्नर, रेल्वे पटरी जवळ चिंचवड येथे घडला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सुमित शाम कांबळे (वय 19, रा. आनंदनगर, चिंचवड) विनोद उर्फ इंटर सुनील ओव्हाळ (वय 27, रा. आनंदनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह विनोद (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष ओमप्रकाश कस्तुरिया (वय 40, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष हे राम मंदिर येथे आले असता आरोपींनी त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अडवले. संतोष यांच्या दुचाकीवरून आरोपी सुमित हा आला. पावर हाउस कॉर्नरवर सुमितचे अन्य साथीदार थांबले होते. संतोष यांना तिथे थांबवून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील 40 हजारांची सोन्याची साखळी, सहा हजारांची सोन्याची बाळी जबरदस्तीने काढून घेतली.

त्यानंतर आरोपींनी संतोष यांना त्यांच्या फोन पे वरून तीन हजार 900 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. असा एकूण 49 हजार 900 रुपयांचा ऐवज आरोपींनी संतोष यांच्याकडून जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर संतोष यांना उलट्या कोयत्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.