केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलाय ८० वर्षांपुढील नागरिकांना घरून मतदानाचा अधिकार

0
155

पुणे, दि. १९ (पीसीबी) : केंद्रीय निवडणूक आयोगाने ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना गेल्या पोटनिवडणुकांपासून घरबसल्या मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सुमारे २.४८ लाखाहून अधिक ज्येष्ठांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकित या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

वृद्ध मतदारांच्या संख्येमध्ये राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये पुणे जिल्हा नंबर एकला असल्याची माहिती लोकसभेच्या अंतिम मतदार यादीमधून समोर आली आहे. संपूर्ण राज्यातून या सवलतीचा फायदा २६ लाखाहून अधिक ज्येष्ठांना घेता येणार आहे. ज्या वृद्ध नागरिकांना या सवलतीचा फायदा न घेता प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तरीही ते प्रत्यक्ष मतदार केंद्रावर जाऊन मतदान करू शकतात. त्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर वृद्ध मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने स्वयंसेवक ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकांमधील एकूण मतदारांच्या तुलनेत प्रत्यक्षात मतदान करणाऱ्या मतदारांचा दिवसेंदिवस घसरणारा टक्का लक्षात घेऊन हा टक्का वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मतदान प्रक्रिया ज्येष्ठांसाठी सुकर व्हावी, या उद्देशाने संपूर्ण देशातील व राज्यातील सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर हलवण्यात आली आहेत. राज्यातील दीडशे गृहनिर्माण सोसायटींची मतदान केंद्र निवासी भागात तयार करण्यात आली आहेत . ज्येष्ठ नागरिकांना नमुना अर्ज १२- ड भरून मतदान केंद्रावर न जाता मतदान करून मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविता येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांना सुलभरित्या मतदान करता यावे, यासाठी पीडब्ल्यूडी ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपचा वापर करून दिव्यांग मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

राज्यात ५ लाख ९० हजार ३८२ दिव्यांग मतदार असल्याचे अंतिम मतदार यादीतून समोर आले आहे. दिव्यांग मतदारांपैकी एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ८५ हजार २०० मतदार आहेत. राज्यात सर्वात कमी दिव्यांग मतदार मुंबईमध्ये असून त्यांची संख्या ४ हजार ८९४ इतकी आहे. जे मतदार चाळीस टक्के दिव्यांग आहेत, असे मतदार घरबसल्या किंवा टपाल मतदानाची सुविधा वापरून मतदान करू शकत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

पीडब्ल्यूडी ॲपचा वापर कसा करावा?
पीडब्ल्यूडी ॲपचा वापर करणाऱ्या नागरिकाला त्याच्या मोबाईलवर युनिक आयडी मिळेल . त्यामुळे त्याला आपल्या मतदानाची नोंद झाल्याचे लक्षात येणार आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे व त्यांना पुन्हा घरी सोडवण्यासाठी शासनामार्फत स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे