कुटुंबातील फूट समाजाला आवडत नाही

0
37

बारामती, दि. 08 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी मोठे बंड केले. पक्षातील ४० आमदारांना बरोबर घेऊन त्यांनी पक्षावर दावा ठोकला. यामुळे पवार कुटुंबातही मोठी फूट पडली. परिणामी कुटुंबातील फूट समाजाला आवडत नाही, हे आपण अनुभवले असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. तसंच, याबाबत त्यांनी त्यांची चूकही मान्य केली आहे. शुक्रवारी गडचिरोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जनसन्मान रॅलीला संबोधित करताना अजित पवार बोलत होते.टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा दारूण पराभव झाला. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. या जागेवरून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं ही आपली चूक होती, अशी कबुलीही अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. आता त्यांनी कुटुंबातील फुटीचा राजकीय क्षेत्रावर परिणाम झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय इतिहासातील एक वेगळा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्याविरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री अत्राम शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहे. अहेरी विधानसभा निवडणुकीत भाग्यश्री अत्राम या शरद पवार गटाच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरून धर्मरावबाबा अत्राम यांनी आपल्या लेक आणि जावयाबाबत वादग्रस्त विधान केले होते. “माझी मुलगी आणि जावयावर माझा विश्वास नाही. त्यांनी माझा विश्वासघात केला आहे. सगळ्यांनी त्यांना प्राणहिता नदी फेकून दिलं पाहिजे”, असं अत्राम म्हणाले.

या राजकीय द्वंद्वाबद्दल अजित पवार म्हणाले, मुलीवर तिच्या वडिलांपेक्षा कोणीही प्रेम करत नाही. बेळगावात तिला लग्न करून देऊनही आत्राम गडचिरोलीत तिच्या पाठीशी उभे राहिले. तिला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवले. आता तू तुझ्याच वडिलांविरोधात लढायला तयार आहेस. हे बरोबर आहे का? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.

“तुम्ही तुमच्या वडिलांना पाठिंबा द्यावा आणि त्यांना जिंकण्यासाठी मदत केली पाहिजे. कारण त्यांच्याकडेच या प्रदेशाचा विकास करण्याची क्षमता आणि दृष्टीकोन आहे. समाज कधीही कुटुंबातील फूट स्वीकारत नाही. मी ही तेच अनुभवले आहे. मी माझी चूक मान्य केली आहे”, असं म्हणत अजित पवारांनी कबुली दिली आहे.