किशोर आवारे हत्या प्रकरणातील चंद्रभान खळदे यांना सशर्त जामीन मंजूर

0
167

किशोर आवारे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चंद्रभान खळदे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे एल गांधी यांनी सशर्त जामीन मंजूर केला. किशोर आवारे प्रकरणात चंद्रभान खळदे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची 12 मे रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हत्या झाली. यामध्ये पोलिसांनी भानू खळदे याच्या मुलासह सात जणांना अटक केली. त्यानंतर 8 जुलै 2023 रोजी चंद्रभान खळदे यांना नाशिक मधील सिंधी कॉलनी मधून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनेच्या 57 दिवसांनी ताब्यात घेतले.

किशोर आवारे हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. खळदे यांच्यातर्फे अॅड. सुधीर शहा, अॅड. अक्षय पटणी, अॅड. पार्थ चव्हाण यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने खळदे यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.

एसआयटी कडून तपास

किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे या एसआयटीच्या प्रमुख होत्या. त्यांची जबाबदारी नवे सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्याकडे देण्यात आली.

गुन्हे शाखांचे तळेगावला स्थलांतर

तळेगाव परिसर उद्योग, शिक्षण, पर्यटन, कृषी अशा अनेक बाबींनी सुजलाम सुफलाम आहे. त्यातच इथल्या गुन्हेगारीचा पॅटर्नही काही वेगळाच आहे. तळेगाव परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट पाच यांच्या कार्यालयांचे तळेगाव येथे स्थलांतर करण्यात आले होते. गुन्हे शाखेची पथके, एसआयटी आणि त्या जोडीला आणखी एक पथक अशी मोठी टीम या हत्या प्रकरणाचा तपास करत होती.

आठ जणांना अटक

शाम अरुण निगडकर (वय 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण उर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे (वय 32), आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28, दोघे रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय 39, रा. आकुर्डी), श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगल (वय 38, रा. वराळे, ता. मावळ), गौरव चंद्रभान खळदे (वय 29, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे), मनीष शिवचरण यादव (वय 21, रा. चांदखेड. ता. मावळ. मूळ रा. बिहार), चंद्रभान भानुदास खळदे (वय 63, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) या आठ जणांना अटक करण्यात आली.