किराणा साहित्य उधार न दिल्याने स्वयंघोषित भाईची दहशत

0
35

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) चिंचवड, – किराणा साहित्य उधार न दिल्याच्या कारणावरून स्वयंघोषित भाईने कोयत्याच्या धाकाने तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी साडेदहा वाजता बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सुनील मारुती लोणी (वय 22, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या किराणा दुकानात असताना आरोपी तिथे आला. ‘तू मला उधार का देत नाहीस’ असे म्हणून त्याने कोयत्याने दुकानातील अंड्याची बरणी फोडली. कोयत्याने फिर्यादीच्या हातावर मारून जखमी केले. कोयता हवेत फिरवून ‘दुकान, घर बंद करून इथून निघून जायचं. मी इथला भाई आहे’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीला ‘माझी माहिती पोलिसांना देतो काय, तक्रार केली तर तुला कापून टाकीन’ अशी धमकी देत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.